ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

NEET पेपर फुटीप्रकरणी जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा पेणमध्ये वंचित बहुजन आघाडी व बहुजन विद्यार्थी संघटनेकडून तीव्र निषेध!

 शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी 

बेणसे-रायगड, दि. २४ (चंद्रकांत अडसुळे) :- राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत (NEET) झालेल्या पेपर फुटीच्या प्रकरणात दोषी असणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांवर आणि विद्यार्थ्यांवर तेथील पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज करत तीव्र मारहाण केली. दिल्ली पोलिसांच्या या दडपशाहीचा आणि अमानुष लाठीहल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज पेण येथे वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.

​आज सकाळी पेण येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर संघटनेच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जंतर-मंतर येथील पोलीस अत्याचाराचा जाहीर निषेध नोंदवला. यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत पेण पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले.

​या प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी सरकार आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. उपस्थित आंदोलकांनी आपले संतप्त विचार मांडताना सांगितले की, देशातील असंख्य आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आणि वर्षानुवर्षे हालअपेष्टा सहन करून आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्यासाठी उच्च शिक्षणासाठी पुढे पाठवण्याचे ध्येय बाळगून असतात. परंतु, शिक्षण व्यवस्थेचे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचे कोणतेही गांभीर्य नसलेल्या विद्यमान सरकारच्या माध्यमातून त्यांच्यातीलच केंद्रीय मंत्री अशा नीट (NEET) सारख्या मोठ्या पेपर फुटीच्या प्रकरणात दोषी आढळत आहेत, ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. ज्या वेळी देशातील उच्चशिक्षित तरुण आपल्या हक्कासाठी आणि न्यायासाठी दिल्लीच्या जंतर-मंतरवर लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते, त्या वेळी पोलिसांनी त्यांच्यावर अत्यंत अमानुषपणे लाठीमार केला. हा लाठीहल्ला म्हणजे लोकशाहीची पायमल्ली असून तो अत्यंत निषेधार्ह आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिलाच पाहिजे, अशी ठाम मागणी यावेळी उपस्थित सर्व आंदोलकांकडून करण्यात आली.

​या निषेध आंदोलनाप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुनील पी. धामणकर, बहुजन विद्यार्थी संघटनेचे पेण तालुका अध्यक्ष नागेश सुर्वे, माजी जिल्हाध्यक्ष संतोष भाई अडसुळे, स्वाभिमानी संघटनेचे नेते विजय धोत्रे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर घायतळे, निरंजन सुर्वे, अश्विनी अडसुळे, मंदार दाभाडे, प्रशांत कांबळे, गोपीनाथ सोनवणे तसेच शिवसेना कार्यकर्ते नरेश भालेराव, नरेश सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते प्रत्यक्ष उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog