ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

मनसेच्या मध्य रायगड जिल्हा सचिव पदी अमोल पेणकर यांची फेरनियुक्ती

पक्षनिष्ठेची दखल; राज ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

 सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव 

रोहा-रायगड, दि. २२ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटनात्मक पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, मध्य रायगड जिल्हा सचिवपदी अमोल पेणकर यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील शिवतीर्थ येथे आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांच्या हस्ते पेणकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

अमोल पेणकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी रोहा शहराध्यक्ष, रोहा तालुकाध्यक्ष तसेच रायगड जिल्हा उपाध्यक्ष या विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम करत शहर, तालुका आणि जिल्हास्तरावरील अनेक संघटनात्मक उपक्रम, आंदोलने व जनहिताच्या प्रश्नांवरील लढ्यांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

रायगड जिल्ह्यातील अनेक प्रमुख नेते कालांतराने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आदी पक्षांमध्ये दाखल झाले. या काळात अमोल पेणकर यांनाही विविध राजकीय पक्षांकडून प्रवेशासाठी प्रयत्न व प्रलोभने देण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता मनसेशी असलेली आपली निष्ठा कायम ठेवली. त्यांच्या या पक्षनिष्ठेची दखल घेत पक्षाध्यक्ष राज ठाकरे, युवा नेते अमित ठाकरे तसेच मनसे नेते संदीप देशपांडे, संपर्क अध्यक्ष योगेश परुळेकर, सहसंपर्क अध्यक्ष राजेश येरुणकर, मध्य रायगड जिल्हा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांचे त्यांच्यावर विशेष विश्वास असल्याचे पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जाते.

पक्षाच्या विविध आंदोलनांमध्ये सहभागी होताना पेणकर यांच्यावर प्रसंगी गुन्हेही दाखल झाले होते. तरीही त्यांनी पक्षाची भूमिका ठामपणे मांडत संघटनात्मक कार्य अखंडपणे सुरू ठेवले. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची आणि पक्षाप्रती असलेल्या निष्ठेची पोचपावती म्हणून मध्य रायगड जिल्हा सचिव पदाची जबाबदारी पुन्हा त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

या नियुक्तीनंतर मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अमोल पेणकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यकाळात दक्षिण रायगडमध्ये मनसेची संघटनात्मक ताकद अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog