ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

जय भवानी सहकारी पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

८ टक्के लाभांश जाहीर, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

रोहा-रायगड, दि. २७ (प्रतिनिधी) :- जय भवानी सहकारी पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापक अध्यक्ष पी. बी. सरफळे यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक तसेच सुधारित उपविधींना सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली.

सभेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, गणेशपूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपाध्यक्ष शंकरराव भगत, सचिव सुहास खरिवले, कोषाध्यक्ष सुनील सानप, संचालक सुनील ठाकूर, मनोहर मेहतर, दीपक जाधव, महेश बामगुडे, किशोर सकपाळ, संदीप सरफळे, हेमंत राणे, अंकुश वाघमारे, सुलभा पवार यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात संचालक महेश बामगुडे यांनी संस्थेच्या ३१ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर सचिव सुहास खरिवले यांनी मागील सभेचे इतिवृत्त, वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रक सादर केले. व्यवस्थापिका नीता शिंगृत यांनी लेखापरीक्षण अहवालाचे वाचन केले. सहकार विभागाच्या आदेशानुसार संस्थेचे सुधारित उपविधी स्वीकारून त्यांना सभेची मंजुरी देण्यात आली.

अहवालावरील चर्चेदरम्यान दगडू बामगुडे, प्रशांत जाधव, बंदिनी धनावडे, अनिता शेडगे, शैला देसाई, मारुती गोळे, संताजी ठाकूर, बळीराम धनावडे, अंकुश म्हसकर, विठ्ठल आयरे, मंगेश ठमके, विनायक पवार, दिलीप देशमुख आणि मंगेश खरिवले यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. संस्थापक अध्यक्ष पी. बी. सरफळे यांनी सर्व प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत सभासदांच्या शंकांचे समाधान केले.

यावेळी सभासदांनी मासिक ठेव, शेअर्स आणि मुदत ठेवी वाढवून संस्थेच्या आर्थिक बळकटीस हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले. अहवाल वर्षात संस्थेच्या नफ्यात झालेल्या वाढीबद्दल सभासदांनी संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. उपाध्यक्ष शंकरराव भगत, कोषाध्यक्ष ॲड. सुनील सानप तसेच ज्येष्ठ संचालक सुनील ठाकूर यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी भविष्यातही शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करावे, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.

संस्थापक अध्यक्ष पी. बी. सरफळे यांनी सांगितले की, सभासदांच्या विश्वासामुळे संस्थेकडे ₹१ कोटी ७५ लाखांहून अधिक ठेवी जमा झाल्या असून यंदा सभासदांना ८ टक्के लाभांशानुसार ₹१ लाख ६४ हजारांचे लाभांश वितरण करण्यात येणार आहे. कर्जवाटप हे ठेवींच्या प्रमाणावर अवलंबून असल्याने अधिकाधिक ठेवी जमा करून संस्थेची आर्थिक उलाढाल वाढविण्यास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच कर्जाची वेळेत परतफेड करणे ही संस्थेच्या आर्थिक सुदृढतेसाठी अत्यंत आवश्यक बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अहवाल वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल व्यवस्थापिका बंदिनी धनावडे व नीता शिंगृत, लिपिक प्रिती जाधव तसेच पिग्मी प्रतिनिधी किरण शिंगृत, रुपेश लोखंडे, विजेता खेरटकर आणि सुगंधा जांभेकर यांचा सभासदांच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. संस्थेला यंदा 'अ' लेखापरीक्षण वर्ग प्राप्त झाल्याबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त करत संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या सभेची सांगता सभासदांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात झाली.

Comments

Popular posts from this blog