जनसंवाद संस्थेतर्फे आषाढी एकादशी उत्साहात साजरी
मुलींच्या लेझीम दिंडीने रंगला परिसर
तुळशी रोपांचे वाटप व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
बोरीवली-मुंबई (प्रतिनिधी) :- महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा आणि वारकरी परंपरेचा वारसा जपणारी आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याच परंपरेचा जागर आणि संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने जनसंवाद संस्था गेल्या १५ वर्षांपासून आषाढी एकादशीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करत आहे.
यावर्षी कष्टकरी महिला संघटना आणि जनसंवाद संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली ती मुलींची लेझीम दिंडी. पारंपरिक वेशभूषेत लेझीम खेळत मुलींनी दिंडीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामुळे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमादरम्यान तुळशीच्या रोपट्यांचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित भाविक व नागरिकांना साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला. लेझीम दिंडीत सहभागी झालेल्या मुलींना त्यांच्या उपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन जनसंवाद संस्थेच्या अध्यक्ष पूनम प्रमोद शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिव अविनाश पवार यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राधा साळवी, जया रेड्डी, वासंती जाधव, सुरेखा आलंवार, आरती पवार, सुनीता धोत्रे, विजू पाटेकर, दीपक वाघमारे आणि वर्षा म्हस्के यांनी मोलाचे सहकार्य केले. महाराष्ट्राची संस्कृती, वारकरी परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्याचा हा उपक्रम पुढेही सातत्याने सुरू ठेवण्याचा संकल्प जनसंवाद संस्था आणि कष्टकरी महिला संघटनेने व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मुली आणि नागरिकांचे जनसंवाद संस्था व कष्टकरी महिला संघटनेतर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.


Comments
Post a Comment