खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी मोफत मॅमोग्राफी शिबिर
सुदर्शन केमिकलच्या सीएसआर उपक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसची साथ!
कर्करोग प्रतिबंधासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार
रोहा-रायगड, दि. ३ (संदीप सरफळे) :- खासदार सुनील तटकरे यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे समाजोपयोगी उपक्रमांची मालिका राबविण्यात येत असून, महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत ७ व ८ जुलै रोजी मोफत मोबाईल मॅमोग्राफी तपासणी व सर्वसमावेशक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीजच्या सीएसआर विभागाच्या सहकार्याने होणाऱ्या या उपक्रमातून स्तन व गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्याबरोबरच अत्याधुनिक तपासणी सुविधा महिलांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या उपक्रमाची माहिती रोहा येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे यांनी दिली. यावेळी शहराध्यक्ष अमित उकडे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, सभापती राजेंद्र जैन, महेंद्र दिवेकर, महेश कोल्हटकर, रविंद्र चाळके, नीता हजारे, उपसभापती गौरी बारटक्के, नगरसेविका पुर्वा मोहिते, युवक अध्यक्ष सागर बोभड, स्वप्नील धनावडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
दोन दिवसीय शिबिरात स्तन कर्करोगासाठी मॅमोग्राफी तपासणी, स्तन व गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती, स्तन स्व-परीक्षणाचे प्रशिक्षण, मुख कर्करोग तपासणी, उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच रक्तक्षय (ॲनिमिया) तपासणी अशा विविध आरोग्य सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कर्करोगाचे सुरुवातीच्या अवस्थेत निदान होऊन वेळेत उपचार सुरू व्हावेत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करून शिबिरात स्वतंत्र महिला सपोर्ट टीम, गर्दीचे नियोजन, अत्याधुनिक मोबाईल मॅमोग्राफी व्हॅन, प्रशिक्षित तंत्रज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तपासणीनंतर संबंधित महिलांना वैद्यकीय अहवाल देण्यात येणार असून, गरज भासल्यास पुढील उपचारासाठीही योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे.
याशिवाय वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. डॉ. सी. डी. देशमुख विद्यासंकुल येथे स्व. अजितदादा पवार क्रीडा नगरी उभारून शालेय विद्यार्थी व नागरिकांसाठी मैदानी आणि बैठे खेळांचा क्रीडा महोत्सव होणार आहे. वाढत्या जंक फूड संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर पोषक आहाराचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी रोहा नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून पौष्टिक पाककला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच शहरातील दोन दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबनासाठी स्वतंत्र स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असून, रिक्षाचालकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी दोन वॉटर कुलर देण्यात येणार आहेत.
खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छांचा वर्षाव न करता समाजोपयोगी आणि आरोग्यदायी उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवेचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. रोहा-अष्टमी परिसरातील महिलांनी मोफत मॅमोग्राफी तपासणीचा लाभ घ्यावा तसेच सर्व नागरिकांनी विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.



Comments
Post a Comment