पॉवरलिफ्टिंग राज्य अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न
रौनक, योगेश, गायत्री, प्रेरणा ठरले ‘स्ट्रॉग मॅन, वुमन’चे मानकरी
मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘इक्विप गटाची राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा’ नुकतीच वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयात उत्साही वातावरणात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील अनेक नामवंत पुरुष व महिला खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. सिनियर, ज्युनिअर, सब ज्युनिअर, मास्टर्स पुरुष व महिला, तसेच अंध व गतिमंद दिव्यांग अशा विविध गटांमध्ये ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. या स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिला खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर मानाच्या 'स्ट्रॉग मॅन' आणि 'स्ट्रॉग वुमन' किताबांवर आपले नाव कोरले.
स्पर्धेत पुरुष गटात रायगडच्या रौनक जितेकर याने सब ज्युनिअर मुले, सिंधुदुर्गच्या ऋषिकेश तेली याने ज्युनियर, मुंबई शहराच्या योगेश गुंड याने सीनियर, संभाजीनगरच्या अजिनाथ शेखाडे याने मास्टर १ आणि पुण्याच्या प्रशांत जगताप याने मास्टर २ गटात "स्ट्रॉग मॅन" किताबाचा मान मिळवला. महिलांच्या गटातही खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत "स्ट्रॉग वुमन" किताब पटकावले. यामध्ये रायगडची गायत्री बडेकर (सब ज्युनिअर), मुंबई उपनगरची शिफा शेख (ज्युनिअर), ठाण्याची प्रेरणा साळवी (सीनियर), पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार (मास्टर १) आणि मुंबईच्या रुबी दास (मास्टर २) या महिला खेळाडू आपापल्या गटात मानकरी ठरल्या.
या भव्य स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री आणि क्रीडाप्रेमी आमदार कालिदास कोळंबकर यांच्या हस्ते करण्यात आले, तर विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने सचिव संजय सरदेसाई यांनी आमदार जठार यांना शक्ती देवता हनुमंत यांचे शस्त्र असलेली 'गदा' प्रतिकात्मक स्वरूपामध्ये देऊन त्यांचा विशेष गौरव केला. यावेळी बोलताना आमदार जठार यांनी भविष्यात कोकण क्षेत्रात सुद्धा अशाच प्रकारच्या भव्य दिव्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.
स्पर्धेच्या दिमाखदार बक्षीस समारंभाला सायन हॉस्पिटलचे निवासी डॉक्टर ऋषिकेश मालावे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अपर्णा घाटे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त दिपाली जळगावकर आणि क्रीडा कार्यकारी अधिकारी प्रीती टेमघरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. जुन्या जाणत्या पुरुष व महिला खेळाडूंना तसेच क्रीडा पत्रकारांना "जीवन गौरव" पुरस्कार देऊन सन्मानित करणे हे या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. यामध्ये माजी खेळाडू आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सौ. आशा नागेश पुजारी (मुंबई) तसेच राष्ट्रीय पंच व आंतरराष्ट्रीय पदक विजेते देवदत्त मनीबाई मार्तंड भोईर यांना "जीवन गौरव" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच, पॉवरलिफ्टिंग खेळाच्या प्रसिद्धीसाठी गेली चार दशके भरीव योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार आणि 'वृत्तमानस'चे वृत्त संपादक नवनाथ दांडेकर यांनाही असोसिएशनतर्फे "जीवनगौरव पुरस्काराने" सन्मानित करण्यात आले. पत्रकारितेच्या प्रेमाखातर पोस्टातील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या दांडेकर यांनी 'दै. सामना'सह विविध माध्यमांतून आपल्या लेखणीद्वारे खेळ आणि खेळाडूंना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांना असोसिएशनचे सचिव संजय सरदेसाई आणि डॉक्टर ऋषिकेश मालावे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
खेळाडूंसोबतच या स्पर्धेत पंचांच्या कामगिरीचाही गौरव करण्यात आला. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत मुंबईच्या जितेंद्र यादव यांनी सर्वोत्कृष्ट पंच म्हणून प्रथम क्रमांक, सुनील अडसूळ यांनी द्वितीय क्रमांक, तर ऋत्विका सरदेसाई यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सर्व विजेत्या खेळाडूंचे आणि पुरस्कारार्थींचे क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment