धाटाव एमआयडीसी परिसरातील बंद कारखान्यात केमिकल कचऱ्याची अनधिकृत विल्हेवाट!
राजकीय वरदहस्तामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
रोहा-रायगड, दि. १६ (किरण मोरे) :- रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील (एमआयडीसी) प्रदूषण आणि बेकायदेशीर कृत्यांचा आलेख दिवसेंदिवस उंचावत चालला असून, यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न कमालीचा गंभीर बनला आहे. सध्या या भागातून एक अतिशय धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर येत आहे. धाटाव एमआयडीसी परिसरामध्ये असलेल्या नामांकित एक्सल कंपनीच्या अगदी समोर एक जुना कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत पडलेला आहे. याच बंद कारखान्याच्या आवाराचा आणि केप्रेस कंपनीच्या आजूबाजूला असलेल्या रिकाम्या जागेचा गैरफायदा काही समाजकंटकांकडून घेतला जात आहे. आसपासच्या कार्यरत कंपन्यांमधून निघणारा अत्यंत घातक आणि रासायनिक (केमिकल) कचरा कोणतीही पूर्वपरवानगी न घेता किंवा नियमांचे पालन न करता या बंद कारखान्याच्या परिसरात बेकायदेशीरपणे आणून टाकला जात आहे.
व्हिडीयो पहा
केवळ हा रासायनिक कचरा येथे आणून टाकला जात आहे एवढ्यापुरतीच ही समस्या मर्यादित राहिलेली नाही, तर या टाकलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला सर्रासपणे आग लावून दिली जात आहे. रासायनिक घटकांचा समावेश असलेल्या या कचऱ्याला आग लावल्यामुळे अत्यंत विषारी आणि उग्र वासाचा धूर संपूर्ण परिसरात प्रचंड प्रमाणावर पसरत आहे. यामुळे धाटाव एमआयडीसी आणि त्याच्या आसपासच्या ग्रामीण भागातील वायुप्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून, संपूर्ण परिसराला धुराचे साम्राज्य आणि दुर्गंधीने वेढले आहे. या विषारी धुरामुळे स्थानिक ग्रामस्थ, कामगार आणि वाटसरूंना डोळे जळजळणे, घशात खवखव होणे आणि श्वसनाचे गंभीर त्रास जाणवू लागले आहेत. भविष्यात यामुळे स्थानिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
या सर्व गंभीर प्रकाराबाबत धक्कादायक बाब अशी की, हे बेकायदेशीर आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणारे कृत्य करणाऱ्यांवर काही बड्या राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्याची जोरदार चर्चा सध्या संपूर्ण रोहा तालुक्यात सुरू आहे. राजकीय आश्रय लाभल्यामुळेच हे कृत्य करणारे लोक कोणत्याही भीतीशिवाय, उघडपणे या ठिकाणी रासायनिक कचरा आणून टाकत आहेत आणि पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून तो पेटवून देत आहेत. या राजकीय दबावामुळेच संबंधित प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक प्रशासन या गंभीर प्रकरणाकडे पूर्णपणे डोळेझाक करत असल्याचा थेट आरोप आता त्रस्त नागरिकांकडून केला जात आहे.
या वाढत्या प्रदूषणामुळे आणि प्रशासनाच्या भूमिकेमुळे स्थानिक जनतेमध्ये आता तीव्र असंतोष पसरला आहे. हा परिसर औद्योगिक क्षेत्रात येत असल्याने येथे सुरक्षेच्या दृष्टीने अनेक ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरातील एम.आय.डी.सी. च्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून या काळ्या कृत्यामागे नेमका कोणाचा हात आहे याचा शोध घ्यावा आणि या संबंधित दोषींवर अत्यंत कडक कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून आणि पर्यावरणप्रेमींकडून अत्यंत आक्रमकपणे केली जात आहे.
Comments
Post a Comment