ब्रेकिंग न्यूज
🚨 राष्ट्रीय लोक अदालतीत ७ हजार ७८ प्रकरणे निकाली; २०.५५ कोटींची तडजोड.!🚨

नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांची सामाजिक बांधिलकी!
दिव्यांग दाम्पत्याला दिला उपजिविकेचा आधार

रोहा-रायगड, दि. १३ (संदीप सरफळे) :- सामाजिक बांधिलकी जपत रोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी दिव्यांग दाम्पत्याला उपजिविकेसाठी भक्कम आधार देत स्तुत्य उपक्रम राबविला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या दिव्यांग पती-पत्नीला स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी त्यांनी पुढाकार घेत भाजी मार्केटमध्ये स्टॉल उपलब्ध करून दिला. यावेळी मुख्याधिकारी अजय एडके, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांच्यासह नगरसेवक महेंद्र गुजर, महेश कोलाटकर, अजित मोरे, माझ सवाल, आलिम मुमेरे, पी. बी. सरफळे, आरोग्य अधिकारी मनोज पुळेकर आदी उपस्थित होते.

रोहा शहरातील दिनेश वाघे आणि वर्षा वाघे हे दोघेही दिव्यांग असून शारीरिक असमर्थतेमुळे त्यांना रोजगारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आर्थिक परिस्थितीही हलाखीची असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला होता. याची माहिती मिळताच नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी दाम्पत्याची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्या परिस्थितीची पाहणी केली.

केवळ आश्वासनांपुरते न थांबता नगराध्यक्षांनी कृतीतून मदतीचा हात पुढे केला. प्रशासन तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविकांना विश्वासात घेऊन नगरपालिकेच्या भाजी मार्केटमध्ये या दाम्पत्यासाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आला. तसेच व्यवसाय उभा करण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत म्हणून वनश्री शेडगे यांनी वैयक्तिक दहा हजार रुपयांची मदतही दिली.

“दिव्यांग बांधव हे समाजाचा अविभाज्य घटक आहेत. त्यांना केवळ सहानुभूती नव्हे, तर स्वाभिमानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे. नगराध्यक्ष म्हणून माझी सामाजिक जबाबदारी ओळखून हा छोटासा प्रयत्न केला आहे. यापुढेही दिव्यांग बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन,” असे नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी सांगितले.

नगराध्यक्षांच्या या कृतीशील भूमिकेचे शहरातील विविध स्तरांतून स्वागत होत असून या मदतीमुळे दिव्यांग दाम्पत्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे.

Comments

Popular posts from this blog