मान्सूनपूर्व सज्जतेचा रोह्यात ‘रंगीत सराव’
आपत्तीसमोर प्रशासनाची यंत्रणा सतर्क!
रोहा-रायगड, दि. २७ (संदीप सरफळे) :- आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी रोहा तालुका प्रशासनाने सज्जतेची चाचणी घेत तालुकास्तरीय प्रशिक्षण आणि रंगीत तालीम (मॉक ड्रिल) पार पाडली. जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार आयोजित या उपक्रमात प्रशासन, महसूल, ग्रामपंचायत, पोलीस यंत्रणा आणि आपदा मित्रांनी एकत्र येत प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचा सराव केला.
ज्येष्ठ नागरिक सभागृह, रोहा येथे सकाळी ११ वाजता झालेल्या प्रशिक्षण सत्रात मंडळ अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सरपंच, नगरपालिका अधिकारी-कर्मचारी, पोलीस पाटील, आपदा मित्र-आपदा सखी तसेच कोतवाल यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा कार्यालयाकडून नियुक्त अधिकारी-प्रशिक्षक एम. के. म्हात्रे यांनी आपत्ती व्यवस्थापनातील तातडीची कृती, समन्वय आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात प्रशिक्षण दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड आणि पोलीस निरीक्षक (आयपीएस) सुयश कुमार सिंह यांनी मान्सून काळात उद्भवणारे पूर, दरड कोसळणे, सर्पदंश, महामार्गावरील अपघात यांसारख्या संकटांवर उपाययोजना आणि दक्षतेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले आपत्ती निवारण साहित्य सुस्थितीत ठेवून ते वेळेवर आपदा मित्रांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. आपदा मित्र सागर दहिंबेकर आणि पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष सुनिल कासार यांनी प्रत्यक्ष अनुभव कथन करत आपत्तीच्या काळातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रशिक्षणानंतर धाटाव येथील एम. बी. मोरे हायस्कूलच्या मागील नदीपात्रात प्रत्यक्ष मॉक ड्रिल घेण्यात आली. या सरावात विविध शासकीय यंत्रणांनी वेळेत उपस्थित राहून आपत्कालीन प्रतिसादाची तयारी दाखवली. संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी निवासी नायब तहसिलदार राजेश थोरे आणि आपत्ती महसूल सहाय्यक संदिप पाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
मान्सून दारात उभा असताना रोह्यातील प्रशासनाने केलेली ही रंगीत तालीम आता प्रत्यक्ष संकटाच्या वेळी किती प्रभावी ठरते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




Comments
Post a Comment