ब्रेकिंग न्यूज
🚨 राष्ट्रीय लोक अदालतीत ७ हजार ७८ प्रकरणे निकाली; २०.५५ कोटींची तडजोड.!🚨

पनवेल महानगरपालिकेला क्रांतिवीरांचा विसर; अदई सर्कलवरील क्रिकेट थिममुळे नागरिक आक्रमक
"इतिहास पुसण्याचा प्रयत्न थांबवा" - छावा क्रांतिवीर सेनेचा मनपाला इशारा!

पनवेल-​रायगड, दि. २० (सुरेश तांडेल) :- येथील 'अदई सर्कल'ला आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे नाव देण्यात आलेले असताना, पनवेल महानगरपालिकेने त्या ठिकाणी चक्क 'क्रिकेट थीम' उभारली आहे. मनपाच्या या भूमिकेमुळे स्थानिक नागरिक आणि क्रांतिवीरप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. येथील क्रिकेट थीम तात्काळ हटवून त्या ठिकाणी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे भव्य व प्रेरणादायी स्मारक उभारण्यात यावे, अशी अधिकृत मागणी १९ मे २०२६ रोजी 'छावा क्रांतिवीर सेने'ने पनवेल महानगरपालिकेकडे पत्राद्वारे केली आहे.

​आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके हे भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामानंतर ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध सशस्त्र लढा उभारणारे ते पहिले महान क्रांतिकारक होते. रायगड जिल्ह्यातील शिरढोण हे त्यांचे जन्मगाव. इंग्रज सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरोधात त्यांनी रामोशी, कोळी, धनगर यांसह विविध समाजघटकांना एकत्र करून स्वराज्यासाठी संघर्ष उभारला आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. इंग्रजांनी त्यांना अटक करून एडन येथील तुरुंगात ठेवले, जिथे १७ फेब्रुवारी १८८३ रोजी त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या या सर्वोच्च बलिदानामुळेच पुढील अनेक पिढ्यांतील क्रांतिकारकांना देशसेवेची प्रेरणा मिळाली.

​या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना छावा क्रांतिवीर सेनेचे रायगड जिल्हाप्रमुख रोशन महादेव पवार म्हणाले, “पनवेल महानगरपालिका हिंदुस्थानातील क्रांतिवीरांचे नाव आणि इतिहास संपवण्याचे काम करत आहे. ज्या चौकाला आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे नाव दिले आहे, तिथे त्यांच्या इतिहासाशी कोणताही संबंध नसलेली क्रिकेट थीम उभारणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. महानगरपालिकेने क्रांतिवीरांच्या स्मृती जपण्याऐवजी त्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न करू नये. आजच्या नवीन पिढीसमोर देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या महापुरुषांचा खरा इतिहास येणे गरजेचे आहे.”

​क्रांतिकारकांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चौकात खेळाऐवजी त्यांच्या दैदिप्यमान इतिहासाची आठवण करून देणारे स्मारक उभारणे आवश्यक असल्याचे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

​ही मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष रोशन पवार, सचिव श्रेयश ठोकळ, संपर्क प्रमुख स्वप्नील घरत, कार्याध्यक्ष विशाल देशमुख, संघटक राजेश रसाळ, सदस्य संग्राम भोपी, पनवेल तालुका अध्यक्ष सुमित जले, सुश्रुत भोईर तसेच दैनिक सामनाचे उपसंपादक योगेश मुकादम यांनी पनवेल महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.

Comments

Popular posts from this blog