पेण येथे उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची सभा संपन्न
प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांचे निर्देश
बेणसे-रायगड, दि. १६ (चंद्रकांत अडसुळे) :- पेण येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची महत्त्वाची सभा उपविभागीय अधिकारी तथा समितीचे अध्यक्ष प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. सभेच्या प्रारंभी समितीचे सदस्य सचिव तथा पेणचे गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांनी उपस्थितांचे स्वागत करून मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. या सभेमध्ये प्रामुख्याने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि तालुक्यातील विविध विकासकामांवर सखोल चर्चा करण्यात आली. पेणचे पोलीस उपनिरीक्षक विनोद सुर्वे यांनी तालुक्यातील ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्यांची सद्यस्थिती मांडली, ज्यावर समितीने समाधान व्यक्त केले.
सभेमध्ये शिहू ग्रामपंचायत हद्दीतील गांधे कातकरी वाडी येथील शाळेचा प्रश्न मार्गी लावून तातडीने मंजुरी दिल्याबद्दल सदस्य चंद्रकांत अडसुळे यांनी गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांचे अभिनंदन केले. याचवेळी अडसुळे यांनी मुंगोशी बौद्धवस्तीला गेल्या ६० वर्षांपासून रस्ता नसल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित केला. यावर अध्यक्ष प्रवीण पवार यांनी संबंधित रस्त्याबाबत योग्य कार्यवाही करण्यात आली असून, या वर्षातच हा रस्ता पूर्ण केला जाईल असे आश्वासित केले. कायद्याच्या जनजागृतीबाबत सदस्य संजय सोनावणे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची दखल घेत, लवकरच तालुकास्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्याचे मान्य करण्यात आले. तसेच समितीच्या सदस्यांना ओळखपत्रे देणे आणि प्रत्येक पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात समितीचे नाव दर्शनी भागात लावण्याच्या सूचनाही अध्यक्ष पवार यांनी प्रशासनाला दिल्या.
रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी आदेशित केलेल्या ४७ मुद्द्यांच्या 'एसओपी'वर (SOP) सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, गुन्हे घडू नयेत यासाठी प्रयत्न करावेत आणि गुन्हा घडल्यास शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी ठोस पुरावे व तपास करावा, अशा सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. या सभेला पोलीस उपनिरीक्षक विनोद सुर्वे, सदस्य चंद्रकांत अडसुळे, संजय सोनावणे, प्रदीप जाधव, विजय जाधव, उमेश दोरे, भूषण वाघमारे आणि कनिष्ठ सहाय्यक नवनाथ पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. शेवटी समितीच्या सदस्यांनी अध्यक्षांचे आभार मानले.

Comments
Post a Comment