भातसई नगरीत रंगणार भक्तीचा उत्सव!
श्री महादाई देवी व श्री धावीर महाराज मूर्तींच्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
रोहा, दि. २३ (संदीप सरफळे) :- रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र भातसई येथे श्री महादाई देवी आणि धावीर महाराज मूर्तींच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येत्या मंगळवार, दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भातसई येथील श्री महादाई देवी व धावीर महाराज देवस्थान परिसरात हा सोहळा संपन्न होणार असून, यानिमित्ताने संपूर्ण गावात भक्तीमय वातावरणाची निर्मिती झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्धापन दिनानिमित्त अभिषेक, महापूजा आणि कीर्तन अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून देवाचे गुणगान गायले जाणार आहे.
या मंगलमयी दिवसाची सुरुवात पहाटेच्या प्रसन्न प्रहरी होणार असून सकाळी ८.०० ते ९.०० या वेळेत काकड आरतीने सोहळ्याचा शुभारंभ होईल. त्यानंतर सकाळी ९.०० ते १०.०० या वेळेत मूर्तींना विधीवत अभिषेक घालण्यात येईल. सकाळी ११.०० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा मोठ्या उत्साहात सुरू होणार असून, या पूजेचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविक उपस्थित राहणार आहेत. दिवसभर मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी असेल आणि या निमित्ताने मंदिराला आकर्षक सजावटही करण्यात येणार आहे.
सायंकाळच्या सत्रात वारकरी परंपरेचे दर्शन घडवणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संध्याकाळी ६.०० ते ७.०० या वेळेत हरिपाठाचे वाचन होईल, ज्यामध्ये भातसई परिसरातील विविध पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने सहभागी होऊन विठ्ठल-नामाचा गजर करतील. भक्तीच्या या जागरानंतर रात्री ७.०० ते ८.०० या वेळेत सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांना होणार आहे.
रात्री ९.०० वाजता या सोहळ्यातील मुख्य आकर्षण असलेल्या कीर्तन सोहळ्याला सुरुवात होईल. यावर्षी कीर्तनाची सेवा करण्यासाठी देवाची आळंदी येथील प्रसिद्ध 'जोग महाराज वारकरी संस्था' यांचे मार्गदर्शन लाभणार असून, ह.भ.प. विक्रांत महाराज पोंडकर आपल्या रसाळ वाणीतून कीर्तन सादर करणार आहेत. या कीर्तनासाठी अनेक नामवंत कीर्तनकार आणि गायकांची देखील उपस्थिती लाभणार असून, रात्री ११.०० वाजेपर्यंत हा भक्तिरस सोहळा रंगणार आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भातसई येथील ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ आणि युवक मंडळ अत्यंत परिश्रम घेत आहेत. सर्व मंडळांच्या संयुक्त विद्यमाने नियोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यासाठी भातसईसह रोहा तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, तसेच या धार्मिक कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment