ब्रेकिंग न्यूज
🚨 डॉ. सचिन पोरे आणि इंजि. महेश चव्हाण यांची रायगड जिल्हा पर्यावरण समितीवर 'तज्ज्ञ' म्हणून नियुक्ती... 🚨 अखिल भारतीय पोलीस टी-२० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाचा ऐतिहासिक विजय; आरपीएफवर मात करत पटकावले विजेतेपद... 🚨

डॉ. सचिन पोरे आणि इंजि. महेश चव्हाण यांची रायगड जिल्हा पर्यावरण समितीवर 'तज्ज्ञ' म्हणून नियुक्ती
भूकंप अभियांत्रिकी तज्ज्ञ आणि अनुभवी इंजिनिअरकडे जिल्ह्याच्या पर्यावरणाची धुरा

रोहा-रायगड, दि. ५ (संदीप सरफळे) :- रायगड जिल्ह्याच्या पर्यावरण रक्षणासाठी आणि शाश्वत विकासाला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रायगडचे जिल्हाधिकारी मा. किसनराव जावळे साहेब यांनी 'रायगड जिल्हा पर्यावरण समिती'वर 'पर्यावरण तज्ज्ञ' म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट विभागाचे डीन डॉ. सचिन पोरे आणि रोहा येथील प्रख्यात कन्सल्टिंग इंजिनिअर श्री. महेश चव्हाण यांची अधिकृत नियुक्ती केली आहे. या दोन्ही मान्यवरांच्या अनुभवाचा आणि तांत्रिक कौशल्याचा फायदा जिल्ह्याच्या निसर्ग संवर्धनासाठी होणार असल्याने या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

​डॉ. सचिन पोरे हे अर्थक्वेक इंजिनिअरिंग (भूकंप अभियांत्रिकी) विषयातील डॉक्टरेट प्राप्त असून त्यांच्याकडे तांत्रिक क्षेत्रातील संशोधनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. सध्या ते लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात संशोधन आणि विकास विभागाचे डीन म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या शैक्षणिक आणि तांत्रिक ज्ञानाचा उपयोग जिल्ह्याच्या पर्यावरणीय धोरणांना दिशा देण्यासाठी मोलाचा ठरणार आहे.

​त्याचप्रमाणे, रोहा ही ज्यांची कर्मभूमी आहे असे प्रख्यात कन्सल्टिंग इंजिनिअर श्री. महेश चव्हाण यांचीही या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. चव्हाण यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विकासकामे करताना निसर्ग आणि प्रगती यांचा योग्य समतोल राखण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या व्यवहारिक अनुभवामुळे आणि सामाजिक बांधिलकीमुळे पर्यावरण समितीच्या कामाला अधिक बळकटी मिळणार आहे.

​जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार आणि औद्योगिक विकास लक्षात घेता, निसर्गाची हानी न होता विकास साधणे हे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत डॉ. पोरे आणि इंजि. चव्हाण यांच्यासारख्या अनुभवी तज्ज्ञांची निवड जिल्ह्याच्या भविष्यासाठी आशादायक ठरणार आहे. या निवडीबद्दल डॉ. सचिन पोरे आणि इंजि. महेश चव्हाण यांच्यावर संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Comments

Popular posts from this blog