बोरिवलीत सार्वजनिक शौचालयाच्या जागेवरून महिला आक्रमक!
अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालण्यासाठी पालिकेचा घाट? राजेंद्र नगरमधील महिलांचा 'हल्लाबोल'
बोरीवली-मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) :- बोरिवली विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १४ अंतर्गत येणाऱ्या राजेंद्र नगर, शिवाजी नगर विभागात सार्वजनिक शौचालयाच्या पुनर्बांधकाम आणि जागेच्या वादावरून मोठे आंदोलन छेडण्यात आले. याठिकाणी शौचालयाच्या नावाखाली भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत स्थानिक महिलांनी महानगरपालिकेच्या निर्णयाविरोधात जोरदार हल्लाबोल केला. पालिकेने या भागातील सध्याच्या शौचालयाला 'धोकादायक' घोषित करून त्याठिकाणी दोन मजली नवीन शौचालय बांधण्याबाबतचे बॅनर लावले होते. मात्र, हे पाऊल स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यासाठी उचलले जात असल्याचे म्हणत महिलांनी संताप व्यक्त केला आणि पालिकेचे बॅनर फाडून आपला निषेध नोंदवला.
स्थानिक महिलांच्या दाव्यानुसार, शौचालयासाठी जी मूळ जागा आरक्षित होती, त्यावर स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण करून अनधिकृत घरे बांधली आहेत. ही मूळ जागा रिकामी करून तिथे नवीन बांधकाम करण्याऐवजी, पालिका सध्या वापरात असलेले छोटे शौचालय पाडण्याचा प्रयत्न करत आहे. जर हे शौचालय पाडले तर स्थानिक रहिवाशांचे प्रचंड हाल होतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. "पालिकेला जर खरोखरच नवीन शौचालय बांधायचे असेल, तर त्यांनी आधी मूळ जागेवरील अनधिकृत कब्जा हटवावा आणि तिथेच बांधकाम करावे. सध्याचे शौचालय पाडण्यापेक्षा आधी नवीन वास्तू उभी करावी आणि त्यानंतरच जुन्या शौचालयाची दुरुस्ती करून ते मुख्य वास्तूला जोडावे," अशी आग्रही मागणी आंदोलक महिलांनी केली आहे.
या गंभीर विषयावर उपमहापौर संजय घाडी आणि महानगरपालिका प्रशासनासोबत वारंवार पत्रव्यवहार करूनही स्थानिकांच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. कोणाचे तरी खिसे भरण्यासाठी आणि विशिष्ट लोकांना वाचवण्यासाठीच पालिकेचा हा खटाटोप सुरू असल्याची भावना जनमानसात उमटत आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि दबावामुळे अखेर महिलांना रस्त्यावर उतरून आक्रमक पवित्रा घ्यावा लागला. या आंदोलनामध्ये पूनम शिंदे, जया रेड्डी, निकिता सोनवणे, श्रद्धा मोरे, सुनीता सोनवणे, सुरेखा अलमवर, नंदा तलवटकर, बिस्मिल्लाह शेख, खैरुन्निसा शेख, शरीफा शेख, मालन शेख, मेघना ठक्कर, शाहीन शेख, लता कोंडेरू, जयकुमार नाडर, पटेल, रफिक शेख, नूर शेख यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि मूळ जागेचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

Comments
Post a Comment