ब्रेकिंग न्यूज
🚨 मुंबईत गुन्हा करून गोव्याच्या दिशेने पळणाऱ्या आरोपीला रायगड जिल्ह्यात अटक! गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि पोलादपूर पोलिसांची मुंबई-गोवा हायवेवर धाडसी कारवाई... 🚨

साडेतीन कोटींची शाळा एक रुपया भाड्याने व्यापाऱ्याला दिली आंदण!

आचारसंहितेच्या पुर्वसंध्येला अर्थपूर्ण व्यवहार

रोहा-रायगड, दि. १९ (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील रोहा नगरपालिकेच्या कारभाराचा एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेली आणि सुमारे साडेतीन कोटी रुपये बाजारमूल्य असलेली सौ. विमलाबाई कन्याशाळेची इमारत एका धनदांडग्या व्यापाऱ्याला अवघ्या एक रुपया महिना भाड्याने आंदण देण्यात आली आहे. पालिका प्रशासनाने केलेल्या या कारनाम्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे.

३० नोव्हेंबर १९९३ रोजी कुमूद शरद मेहेंदळे यांनी आपल्या कुटुंबाची ही अमूल्य वास्तू केवळ एका उदात्त हेतूने नगरपालिकेला दान दिली होती. 'या वास्तूत फक्त सौ. विमलाबाई मेहेंदळे यांच्या नावाने 'कन्या शाळा' चालवावी,' ही मुख्य अट या बक्षीस पत्रात होती. मात्र प्रशासनाने या अटीला केराची टोपली दाखवत चक्क व्यापारीकरणाचा घाट घातला. तत्कालीन मुख्याधिकारी तथा प्रशासकांनी ६ ऑक्टोबर २०२३ च्या सर्वसाधारण सभेत या संशयास्पद ठरावाला मंजुरी दिली. विशेष म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या अवघ्या काही तास आधी हा ३० वर्षांचा दीर्घमुदतीचा भाडेपट्टा करार घाईघाईने करण्यात आला. हसमुख जैन यांच्या रोहा वेल्फेअर ट्रस्टला एक रुपया मासिक भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. 

एक लाख भाडे अपेक्षित

नगर परिषदेच्या या निर्णयाविरोधात रोहा सिटिझन फोरमने आवाज उठवला आहे. ऑक्टोबर २०१७मध्ये नगररचना विभागाच्या त्रिसदस्यीय समितीने या इमारतीचे प्रतिमहिना एक लाख ८ हजार रुपये इतके भाडे निश्चित केले होते. तरीही साडेतीन कोटींची सरकारी मालमत्ता प्रशासनाने कवडीमोलाने खासगी व्यक्तीला आंदण दिली. ज्या शाळेत गरीबांच्या मुलींनी शिकावे तिथे व्यापाऱ्यांचे हित जपले जात आहे. दरम्यान रोहा सिटिझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब यांनी 'रुपयाभराच्या' व्यवहाराचा जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

Comments

Popular posts from this blog