तीन वेळा अपयश, जिद्द सोडली नाही, रोह्याच्या पोराने UPSC क्रॅक केलीच!
नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी केला गौरव
रोहा दि. १२ (संदीप सरफळे) :- संपूर्ण देशभरातील केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ६) जाहीर झाला. डॉ. सी. डी. देशमुख यांच्यानंतर प्रथमच रोह्याच्या लेकानं यूपीएससी परीक्षा क्रॅक करीत यश मिळवलं आहे. संकेत सदाशिव कुंभार असं यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. संकेतचे वडील सदाशिव कुंभार हे शिक्षक असून आई जयश्री उच्च शिक्षित आहेत. संकेतने याआधी ३ वेळा यूपीएससी परीक्षा दिली, मात्र यश मिळालं नाही. अखेर चौथ्या प्रयत्नात त्याने देशातून ५३९ वा रँक मिळवत यशाला गवसणी घातली. रोह्याच्या धावीर प्लाझा-कृपा सोसायटीत बालपण गेलेल्या संकेत कुंभार यांनी रोह्यातील मेहेंदळे हायस्कूलमध्ये मराठी माध्यमातून शालेय शिक्षण घेऊन लोणेरे येथील बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी मध्ये मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. भविष्यात केंद्रीय सेवांमध्ये कार्य करून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देणार असल्याचे संकेत यांनी सांगितले.
दरम्यान संकेतने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्यानं त्याचं अवघ्या जिल्ह्यातून कौतुक होत आहे. रोहा नगरपालिकेच्या (डॉ. चिंतामणराव देशमुख स्मारक) ग्रंथालय व स्पर्धा परिक्षा अभ्यासिकेत संकेतने अभ्यास करून कठीण आणि कठोर परिश्रम आणि योग्य नियोजनाच्या बळावर हे यश संपादन केले. बुधवारी नगरपालिकेच्या वतीने शाल, श्रीफळ. पुष्पगुछ, भेटवस्तू आणि डॉ. सी. डी. देशमुख यांची प्रतिमा प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी यावेळी नगराध्यक्षा वनश्री शेडगे, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, गटनेते महेंद्र गुजर, सभापती महेश कोलाटकर, मयूर दिवेकर, राजेंद्र जैन, निता हजारे, अजित मोरे, प्रशांत कडू, स्नेहा अंबरे, रोशन चाफेकर, पूर्वा मोहिते तसेच माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, स्वप्नील धनावडे, प्रेषित बारटक्के, समाधान शिंदे, वैभव कुलकर्णी, संकेत कुंभार यांचे आई -वडील आणि नातेवाईक, नगर पालिका अधिकारी वर्ग उपस्थित होते.

Comments
Post a Comment