साखर गावच्या श्री कालिकामाता देवीचा ६ एप्रिलला भव्य वार्षिक यात्रौत्सव
खेड, दि. ३१ (अंकिता शिगवण) :- सह्याद्रीच्या कुशीत आणि स्वयंभू नागेश्वर व परशुरामाच्या पावन भूमीत वसलेल्या निसर्गरम्य साखर गावचे ग्रामदैवत श्री कालिकामाता देवीचा वार्षिक यात्रौत्सव यंदा सोमवार, दिनांक ६ एप्रिल २०२६ (चैत्र कृष्ण पक्ष चतुर्थी) रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पंधरागावच्या ऐतिहासिक गादीचा वारसा लाभलेले हे जागृत देवस्थान असून, या उत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
यात्रौत्सवाच्या दिवशी सकाळी ८ वाजता ग्रामस्थ पारंपरिक रितीने मानकऱ्यांकडे जाऊन लाटेची विधिवत पूजा करतील आणि त्यानंतर लाट तोडून उत्सवास प्रारंभ होईल. सकाळी ११ वाजता मानकऱ्यांच्या वाडीतून लाटेची भव्य मिरवणूक काढली जाईल, तर सायंकाळी ४ वाजता ढोल-ताशांच्या गजरात ही लाट खरखांबावर चढवली जाईल. सायंकाळी ६ वाजता पंचक्रोशीतील निमंत्रित दैवतांचे परंपरेनुसार आगमन होईल. यामध्ये चौकीचीवाडी, जांभूळवाडी आणि बामणवाडी या तीन वाड्यांतील मानकरी निमंत्रित देवतांचे पूजन करून महाप्रसादाचा नैवेद्य अर्पण करतील. यावेळी भाविकांकडून नवस फेडले जातात आणि रात्री साडेआठ वाजता सर्व पालख्या यात्रस्थळी मार्गस्थ होतात.
उत्सवाच्या मुख्य दिवशी सायंकाळी ७ वाजता देवीची महाआरती होऊन लाट फिरविण्याचा कार्यक्रम पार पडेल. रात्री ९ वाजता विविध ठिकाणांहून आलेल्या पालख्यांची गळाभेट होईल. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी, सनईचा सूर आणि ढोल-ताशांच्या गजरात पालख्या नाचवत मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून नयनरम्य छबिना सोहळा रंगणार आहे. गणेश पुराणातील उल्लेखानुसार चैत्र कृष्ण चतुर्थी ही 'तिथींची माता' मानली जात असल्याने, या दिवशी होणाऱ्या साखरच्या यात्रौत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नुकतेच देवीचे हेमाडपंथीय शैलीतील पाषाणी मंदिर आणि कोरीव नक्षीकाम केलेले प्रवेशद्वार भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
मंगळवार, दिनांक ७ एप्रिल रोजी देवीचा 'समा' साजरा होईल. यावेळी मानकरी मंडळींकडून श्री कालिकामाता आणि श्री झोलाई माता (तळवट-जावळी) यांचे पूजन करून ओटी भरली जाईल. त्यानंतर परंपरेनुसार गळाची पूजा करून लाटेची दिशा बदलली जाईल. शेवटी सर्व निमंत्रित पालख्यांची वाजतगाजत पाठवणी करून उत्सवाची सांगता होईल. या सोहळ्यासोबतच रात्री 'संगिताची राणी कराडकर (कराड)' यांचा सुप्रसिद्ध लोकनाट्य तमाशा आयोजित करण्यात आला आहे. या संपूर्ण मंगलमयी उत्सवाचा लाभ घेण्यासाठी खेड, चिपळूण, दापोली, मंडणगड आणि गुहागर परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन साखर गाव ग्रामस्थ कमिटी व मुंबई ग्रामस्थ मंडळाने केले आहे.

Comments
Post a Comment