ब्रेकिंग न्यूज
🚨 पुणे पोलिसांचा बुधवार पेठेत मोठा दणका! अल्पवयीन मुलीची सुटका करत १५ बांगलादेशी नागरिकांना घेतले ताब्यात🚨

जमीन महसूल वसुलीसह फेरफार प्रकरणांचा तातडीने निपटारा करा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

अहिल्यानगर जिल्ह्यात विविध विकासकामांची केली पाहणी

अहिल्यानगर, दि. १० (प्रतिनिधी) :- तालुक्यातील जमीन महसूल वसुलीचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करत फेरफारच्या प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
​अहिल्यानगर तहसील कार्यालयात आयोजित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया मार्गदर्शन करत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले , प्रलंबित प्रकरणांमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी वेळबद्ध कार्यवाही करण्यात यावी. फेरफार प्रकरणे मंजूर करताना नियम व कार्यपद्धतींचे काटेकोर पालन करून पारदर्शक व लोकाभिमुख कामे करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी तालुक्यातील विविध विकासकामांना भेटी दिल्या. मौजे पिंपळगाव उज्जैनी येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या शासकीय जागेवर १२ लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक लाभार्थ्याला ५०० चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, घरकुल बांधकाम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच 'डीसीएस' प्रकल्पांतर्गत रोहिदास गंगाधर वाघ व चंद्रकला कानिफ वाघ या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांनी पिकांची पाहणी केली.
​मांजरसुंबा येथील गांडूळखत प्रकल्प व गोशाळेस जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन व्यवस्थापनाची माहिती घेतली. पशुधनाचे आरोग्य, चारा व्यवस्थापन, स्वच्छता व गोसंवर्धनाच्या उपाययोजनांचा आढावा घेत त्यांनी गोशाळा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. तसेच 'स्वच्छ सुंदर माझा गाव' उपक्रमांतर्गत गावभेट देऊन त्यांनी स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. गावातील स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणांची निगा, सांडपाणी व्यवस्थापन व नागरिकांचा सहभाग याबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत स्वच्छता अभियान सातत्याने राबविण्याचे निर्देश दिले.


Comments

Popular posts from this blog