गणपती बाप्पाचे उद्या आगमन, स्थापनेचा मुहूर्त दुपारपर्यंत - दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक


बेणसे-रायगड (चंद्रकांत अडसुळे) :- भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव म्हणजे मातीच्या गणेशमूर्तीचे पूजन करण्यास सांगितले आहे. प्राचीनकाळी शेतावर किंवा नदीकाठी जाऊन तेथील मातीची गणेश मुर्ती तयार करून तेथेच पुजून लगेच विसर्जन करीत असत. त्यानंतर गणेशमूर्ती घरी आणून दीड, तीन, पाच, सात किंवा अनंत चतुर्दशी पर्यंत पूजन करून मूर्तीचे विसर्जन करण्याची प्रथा सुरू झाली.

गणेशमुर्ती स्थापनेचा मुहूर्त

या वर्षी बुधवार २७ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यान्हकाळ सकाळी ११.२५ ते दुपारी १.५४ पर्यंत आहे.यावेळेत श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून षोडशोपचार पूजा करावी. या वेळेत शक्य झाले नाहित तर सूर्योदयापासून दुपारी १.५४ पर्यंत गणेशमुर्ती स्थापना व पूजन करावे. गुरूजी उपलब्ध झाले नाहीतर स्वतः पुस्तकावरून श्री गणेशपूजन करावे. महिलांनीही श्री गणेशपूजन करायला हरकत नाही. गणपतीचे गुण आपल्या अंगी यावेत. यासाठी श्री गणेशपूजन करावयाचे असते. गणपती हा चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती आहे. आपण आयुष्यात एक विद्या आणि एकतरी कला संपादन करायला हवी. श्री गणेश हा गणांचा नायक आहे. आपण आपल्यातील नेतृत्व गुण जोपासायला हवेत. गणपती हा सुखकर्ता, दु:खहर्ता आहे.आपणही इतरांचे दुःख कमी होण्यासाठी त्यांना मदत करायला पाहिजे. गणेश हा मातृभक्त आहे.आपण आपल्या माता पित्याचा नीट सांभाळ करायला पाहिजे. गणपतीने अनेक राक्षसांना ठार मारले.आपणही आपल्यातील आळस, अनीती, अनाचार इत्यादी दुर्गुणांचा नाश करायला हवा.


पुढल्या वर्षी १८ दिवस उशीरा आगमन

श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी 'गणपती बाप्पा मोरया',पुढच्या वर्षी लवकर या'! अशी विनंती गणेशभक्त  गणेशाला करीत असतात. परंतू पुढच्या वर्षी जेष्ठ अधिकमास येणार असल्याने गणपती बाप्पांचे आगमन १८ दिवस उशीरा म्हणजे सोमवार १४ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे.

ज्येष्ठा गौरी पुजन

या वर्षी रविवार ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५.२५ पर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना जेष्ठा गौरी आणाव्यात. सोमवार १ सप्टेंबर २०२५ रोजी ज्येष्ठा गौरींचे पूजन करावे आणि मंगळावर २ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ९ .५०पर्यंत मूळ नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचे विसर्जन करावे. गौरी ही गणपतीची माता पार्वती होय. हिला महालक्ष्मी असेही म्हणतात. प्रथेनुसार तेरड्याच्या, खड्यांच्या, मुखवट्यांच्या किंवा मूर्तीच्या  रूपात गौरी आणल्या जातात. गौरीला प्रथेप्रमाणे नैवेद्य अर्पण करतात. काही ठीकाणी चौसष्ट प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. सासरी गेलेली कन्या गौरीच्या सणाला माहेरी येते.तिच्या आवडीचे भोजन केले जाते. पुजन करावयाची गणेशमुर्ती ही मातीची हवी. गणेशमुर्ती लहान असली तरी भक्ती श्रध्दा मोठी हवी.सजावटीसाठी थर्मोकोलसारख्या पर्यावरणास घातक असलेल्या गोष्टींचा वापर करू नये. आरती ही मधुर स्वरात म्हणावी. अगबत्ती, धूप, कापूर हे केमिकल फ्री असावेत. गणेशमूर्तीचे विसर्जन हे कृत्रिम तलावातच करावे. आपले सण - उत्सव हे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी असतात. पर्यावरणाचा नाश करण्यासाठी नसतात.

Popular posts from this blog