आंबेनळी घाट मार्गावरील वाहतूक सुरु


रायगड (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) मार्गावरील वाहतूक अखेर पुन्हा सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले असून अतिवृष्टीचे दिवस वगळता इतर सर्व दिवशी या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीची परवानगी दिली जाणार आहे.
पूर्वीच्या आदेशानुसार सुरक्षिततेच्या दृष्टीने आंबेनळी घाट मार्गावर अवजड वाहतुकीस पूर्ण बंदी घालण्यात आली होती. तसेच पावसाळ्यात ऑरेंज आणि रेड अलर्ट असताना हलक्या वाहनांनाही बंदी घालण्यात आली होती. याशिवाय रात्रीच्या वेळी सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णतः थांबविण्यात आली होती.
दरम्यान, कार्यकारी अभियंता (कोकण), महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने घाटरस्त्यावरील सुधारणा आणि मजबुतीकरणाची कामे पूर्ण केली आहेत. ढिगारे हटविणे, अडथळे दूर करणे आणि रस्ता प्रवासासाठी सुरक्षित बनविण्याची कामे पूर्ण झाल्यामुळे रस्ता पुन्हा सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी महाड यांच्या अहवालाचा अभ्यास करून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हा निर्णय घेतला, त्यानुसार आंबेनळी घाट मार्ग आता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्यात आला असून अतिवृष्टीच्या दिवसांत मात्र हा मार्ग सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद ठेवला जाईल.

Popular posts from this blog