आयुष्मान कार्डसाठी ३१ ऑगस्ट अंतिम मुदत
रायगड (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील नागरिकांना 'एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' (एबी-पीएमजेएवाय) 'महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना' (एमजेपीजेएवाय) यांचा लाभमिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
या अंतर्गत ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत नागरिकांना 'आयुष्मान भारत गोल्डन कार्ड' तयार करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार असून, यामध्ये १ हजार ३५६ प्रकारच्या शस्त्रक्रिया व विशेष उपचारांचा समावेश आहे. तसेच कुटुंबातील ७० वर्षांवरील सदस्यांना 'आयुष्मान भारत वय वंदना कार्ड'च्या माध्यमातून अतिरिक्त पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. आरोग्य योजनांचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे आयुष्मान भारत गोल्ड कार्ड असणे बंधनकारक आहे.
याशिवाय आशा स्वयंसेविका, आपले सरकार सेवा केंद्र, तसेच स्वस्त धान्य दुकानदार (रेशन दुकानदार) यांच्या माध्यमातूनही कार्ड तयार करता येईल. 'आयुष्मान भारत गोल्ड कार्ड सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये लाभार्थी उपचार घेऊ शकतात. जास्तीत जास्त नागरिकांनी या विशेष मोहिमेत सहभाग नोंदवून स्वतःचे व आपल्या कुटुंबीयांचे कार्ड त्वरित काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
शासनाने हे कार्ड बनविण्याची प्रक्रिया आता सुलभ केली असून, नागरिकांना गुगल प्ले स्टोअरवरील 'आयुष्मान अॅप' डाउनलोड करून किंवा https://beneficiary.nha.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन स्वतःच 'आयुष्मान भारत गोल्ड कार्ड' तयार करता येईल.