रोहा नगर पालिकेच्या नेहरुनगर शाळेला अखेरची घरघर; विद्यार्थी पट शुन्य
अतिरिक्त शिक्षकांवर बदलीची टांगती तलवार
रोहा (प्रतिनिधी) :- रोहा नगर पालिकेची नेहरुनगर प्राथमिक शाळा अखेरची घटका मोजत आहे. या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी पट शुन्य झाल्याने शाळा ओस पडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नेहरूनगर शाळा बंद करण्याविषयी मागणी होत होती. या शाळेच्या दोन पदवीधर शिक्षकांच्या सहा आकडी पगाराचा भार सरकार नाहक सोसत आहे. या संपूर्ण परिस्थितीस नगरपालिका प्रशासन अधिकारी जबाबदार असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षांपासून नेहरूनगर शाळेत प्रत्यक्ष हजर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोन किंवा तीनच होती. विद्यार्थीच नसल्याने शाळेला इतर ऍक्टिव्हिटीज आणि खेळांमध्ये भाग घेणे कठीण झाले. शाळेत खेळ आणि इतर ॲक्टिव्हिटी नसल्यास विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासावर परिणाम होतो. विद्यार्थ्यांची खेळातील आवड कमी होते. तसेच, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि टीमवर्क सारखी कौशल्ये सुद्धा विकसित होत नाहीत. या पार्श्वभूमीवर नेहरूनगर शाळा बंद करण्याविषयी मागणी जोर धरू लागली होती. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पालकांनी नेहरूनगर शाळेकडे पुर्णतः पाठ फिरविली असून शाळेचा पट शुन्य झाला आहे.
रोहा नगरपालिकेच्या शाळांतील पट दिवसेंदिवस कमी होत असताना नगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाकडे गेल्या वर्षी मार्च महिन्यात सात वाढीव शिक्षकांची मागणी केली होती. या नवीन शिक्षकांना रुजू करून घेताना खूप मोठा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा होती. नेहरूनगर शाळा बंद पडली तर नव्याने रुजू झालेले शिक्षक अतिरिक्त ठरणार असून त्यांची बदली क्रमप्राप्त आहे. या शिक्षकांच्या लाभासाठी प्रशासन अधिकारी यांनी शुन्य विद्यार्थी पट असताना सुद्धा नेहरूनगर शाळा सुरू ठेवल्याचे बोलले जात आहे.
"रोहा नगरपालिकेच्या नेहरूनगर प्राथमिक शाळेचा पट शुन्य झाला आहे. या शाळेचे आणि शिक्षकांचे समायोजन रोहा नगर पालिकेच्या दुसऱ्या शाळेत करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. आठ ते दहा दिवसांत कार्यवाही पुर्ण होईल."
- संतोष कंटे, प्रशासन अधिकारी, रोहा नगरपालिका