वृक्षांच्या बाबतीत गडचिरोलीला 'कोट्यधीश' जिल्हा बनवणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


गडचिरोली (प्रतिनिधी) :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गडचिरोली येथे 'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र' अभियानांतर्गत 1 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ ही एक व्यापक चळवळ राज्य शासनाने हाती घेतली आहे. 2014 ते 2019 या कालावधीत 50 कोटी वृक्ष लागवडीचा यशस्वी उपक्रम राबविण्यात आला होता. यावर्षी राज्यात 11 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात उत्कृष्ट वनसंपदा असून, राज्याचे वनसंतुलन टिकवून ठेवण्यामध्ये या जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. गडचिरोलीमध्ये पर्यावरणपूरक औद्योगिक विकास करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यामुळे वन आच्छादन वाढवणे आणि त्याचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने 1 कोटी वृक्ष लागवड मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.  ही मोहीम अत्याधुनिक पद्धतीने ट्रॅक केली जाणार असून, लावलेल्या झाडांचे जास्तीत जास्त जगण्याचे प्रमाण राखण्याचा प्रयत्न केला जाईल. वृक्षसंवर्धन आणि वृक्षवाढीचे संपूर्ण ट्रॅकिंग अ‍ॅप आणि इतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्यात येईल. गडचिरोलीला देशातील सर्वात हरित जिल्हा बनविणार, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
पोलीस विभागाच्या वतीने नक्षलग्रस्त कुटुंबांतील मुलांना थेट पोलीस विभागात नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार 23 जणांना नियुक्ती देण्यात आली आहे. त्यातील 2 जणांना कार्यक्रमादरम्यान प्रातिनिधिक स्वरूपाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. गडचिरोलीत मरणासन्न अवस्थेत असलेल्या नक्षलवादासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, की आज गडचिरोलीतील एकही गाव माओवाद्यांना पाठिंबा देत नाही. सर्व गावं भारताच्या संविधानासोबत, भारत सरकारसोबत आणि शासनाच्या संस्थांसोबत उभी आहेत. माओवाद आता मोजक्याच ठिकाणी उरला आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नक्षल चळवळीतील लोकांना आत्मसमर्पण करून, मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले.
यावेळी  राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार परिणय फुके, आमदार डॉ. मिलींद नरोटे, आमदार धर्मरावबाबा आत्राम, संबंधित अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Popular posts from this blog