रायगड जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध मोहीम सुरू: १४ फेब्रुवारीपर्यंत २३ लाख नागरिकांचे सर्वेक्षण

रायगड (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध मोहीम अभियानाला शुक्रवार (दि. ३१) पासून सुरूवात झाली असून, ही मोहीम १४ फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील २३ लाख नागरिकांचे सर्वेक्षण केले जाणार असून, ५ लाख १६ हजार घरांना भेटी दिल्या जातील. संशयित कुष्ठरुग्ण ओळखून त्यांच्यावर त्वरित उपचार करण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र, पोयनाड येथे मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे, जिल्हा कुष्ठरोग सहायक संचालक डॉ. प्राची नेहूलकर, जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. सचिन संकपाळ, अलिबाग गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

या मोहिमेसाठी २ हजार १०० पथके स्थापन करण्यात आली असून, ४०३ पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी घरभेटी देऊन संशयित रुग्ण शोधणार असून, त्यांच्यावर औषधोपचार सुरू केले जाणार आहेत. कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि निदान न झालेले रुग्ण शोधण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची असून, बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

Popular posts from this blog