खड्ड्यात गेलेल्या नागोठणे-रोहे रस्त्याची युद्धपातळीवर डागडुजी
शिवसेनेच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग
रोहा (विशेष प्रतिनिधी) :- अलिबाग-रोहे रस्त्यावर अष्टमी येथे रेल्वे उड्डाणपुलाचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू असून या ठिकाणी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. जवळपास अर्ध्या किलोमीटरच्या परिसरात प्रचंड खड्डे आणि त्यात पावसाच्या साठलेल्या पाण्यामुळे चिखलाचा राडारोडा झाला आहे. या फाटलेल्या रस्त्यातूनच रोहे, नागोठणेकरांना प्रवास करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जनमानसातून प्रचंड प्रक्षोभ उसळला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (उद्धव बाळासोब ठाकरे) रेल्वे प्रशासनाच्या नाकर्तेपणा विरोधात उग्र आंदोलनाचा इशारा दिला. शिवसैनिकांनी रोहे तहसील कार्यालयावर धडक देत तसे निवेदन रोहे तहसीलदारांना दिले. शुक्रवारी होणाऱ्या या आंदोलनालाच्या पार्श्र्वभूमीवर रोह्याचे तहसीलदार किशोर देशमुख यांनी रेल्वेचे ठेकेदार मे. आर. के. मदानी यांना नोटीस बजावली. तसेच रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कडक शब्दांत सुनावले. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या रेल्वे प्रशासनाने तत्काळ डागडुजीचे काम हाती घेतले. बुधवारी मध्यरात्री पासूनच खड्डे आणि प्रचंड चिखलाचा राडारोडा झालेल्या नागोठणे-रोहे मार्गाची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे कंबरतोड प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
प्रवाशांना दिलासा
शिवसेनेच्या आंदोलनाच्या दणक्याने ढिम्म रेल्वे प्रशासनाचे डोळे खाडकन उघडले आणि जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याची लेव्हल करणे आणि पेव्हर ब्लॉकने खड्डे बुजवण्याचे काम बुधवारी मध्यरात्रीच सुरू केले. रेल्वे ठेकेदार मदानी यांनी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने शिवसेनेने नियोजित आंदोलन स्थगित केले आहे. दरम्यान या रस्त्याच्या कामामुळे खड्यातून प्रवास करून मेटाकुटीला आलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
"माननीय तहसीलदार किशोर देशमुख साहेब आणि पोलीस प्रशासन यांच्या विनंतीवरून शुक्रवारचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र दुरुस्तीच्या कामात कुठल्याही प्रकारची हयगय दिसून आल्यास रेल्वे प्रशासनाला शिवसेनेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. नागरिकांच्या आणि वाहनधारकांच्या सुरक्षतेविषयी शिवसेना कटिबद्ध आहे."
- समीर जनार्दन शेडगे, रोहा तालुका प्रमुख
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)