दोन दुचाकींची समोरासमोर धडक

रोहा (प्रतिनिधी) :- दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर जबर धडक होऊन घडलेल्या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवार, २२ मे रोजी रात्री ८.५० वाजताच्या सुमारास रोहा मुरुड मार्गावरील गोफण गावानजिक घडली. शरद कोटकर, याकुब तडवी व दयानंद ठाकूर अशी जखमींची नावे आहेत. यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, जखमींपैकी रोहा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी शरद कोटकर आणि याकूब तडवी सरकारी दुचाकी वाहनाने सागरकवच अभियान अंतर्गत गोफण परिसरात गस्त घालत होते. 


रात्री ८.५० वाजता नागोठणे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी दयानंद ठाकूर यांनी दारुच्या नशेत रस्त्याच्या चुकीच्या साईडने भरदाव वेगाने येऊन आपल्या ताब्यातील सिबी युनिकॉर्न (क्रमांक एम एच ०६ बी एस३७७५) या दुचाकीने सरकारी मोटार सायकलला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या  अपघातात पोलीस कर्मचारी तडवी यांना जबर मार बसल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने मुंबईला हलविण्यात आले. तर शरद कोटकर व दयानंद ठाकूर यांना रोह्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दारूच्या नशेत चुकीच्या साईडला येऊन वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स. पो. निरीक्षक संदीप ऐदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक मनिष हिरवरकर पुढील तपास करीत आहेत.

Popular posts from this blog