साई येथील तटकरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा व वक्तृत्व स्पर्धेत घवघवीत यश
सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव
साई-माणगाव, दि. १३ (हरेश मोरे) :- तालुक्यातील साई पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सुनिल दत्तात्रेय तटकरे विद्यालय साई या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांसह वक्तृत्व स्पर्धेत या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील विद्यार्थिनी हित्तांक्षी हिने तालुकास्तरीय ३ किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला होता, तिथेही तिने आपल्या खेळातील सातत्य राखत जिल्हास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक संपादन केला. याबरोबरच कशिश सुभाष कालेकर याने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत उत्तम कामगिरी नोंदवत द्वितीय क्रमांक पटकावला, तर क्रीडा क्षेत्राबरोबरच बौद्धिक क्षेत्रातही विद्यालयाचा ठसा उमटवत अनुष्का अश्विन बनसोडे हिने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आपल्या ओघवत्या वाणीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल साई पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गजानन इंदर अधिकारी, उपाध्यक्ष बळीराम गणपत लाड, सचिव गणेश नारायण पवार यांच्यासह संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या दैदीप्यमान यशाबद्दल पालकवर्ग आणि संपूर्ण पंचक्रोशीतून यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा मोठा वर्षाव होत आहे.

Comments
Post a Comment