माणगांव तालुक्यातील निवी गावाला जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट
रायगड, दि. २५ (प्रतिनिधी) :- शासनाच्या व स्वदेस फौन्डेशनच्या सहकार्यातून जिल्ह्यात आतापर्यंत स्वच्छ ,सुंदर, स्वस्थ, सक्षम, आत्मनिर्भर झालेली शंभर गावे स्वप्नातील गावे म्हणून घोषित केलेली आहेत. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नुकतीच माणगाव तालुक्यामधील निवी या गावाला भेट दिली व स्वदेस फाउंडेशन तर्फे गावांमध्ये सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. या गावाला स्वप्नातील गाव असे संबोधले जाते.
रायगड जिल्ह्यामधील माणगांव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर व सुधागड तालुक्यामध्ये ग्रामीण सक्षमीकरणाचे काम गाव विकास समिती सहकार्यातून सुरु आहे. रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेस फाउंडेशन च्या वतीने रायगड जिल्ह्यामध्ये सध्या ७०० गावांमध्ये स्वच्छ ,सुंदर, स्वस्थ, सक्षम, आत्मनिर्भर या विषयावर आधारित स्वप्नातील गावे स्वदेस फौन्डेशनच्या व शासनाच्या सहकार्यातून बनत आहेत, आतापर्यंत शंभर गावे स्वप्नातील गावे म्हणून घोषित केलेली आहेत. गावभेटीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी किशन जावळे व प्रांताधिकारी डॉ.संदीपान सानप, नायब तहसीलदार अरविंद घेबुड, गटविकास अधिकारी संदीप जठार व उपसंचालक तुषार इनामदार, प्रसाद पाटील यांचे स्वागत गाव विकास समिती, महिला वर्ग तर शाळकरी मुला मुलींनी लेझीमच्या तालावर स्वागत केले
यावेळी गावातील अंगणवाडी सौर उर्जा प्रकल्प, बकरी पालन शेतकरी, दुग्धव्यवसाय शेतकरी, मोतीबिंदू उपचार केलेल्या लोकांशी तसेच आरोग्य मित्र, ज्ञान मित्र, पशुमित्र, शेतकरी कंपनी संचालक, बँक सखी यांच्याशी जिल्हाधिकारी यांनी चर्चा केली तसेच गावातील वाचनालयाला भेट दिली व शिष्यवृत्तीधारक विध्यार्थीशी संवाद साधला. पूर्वी निवी गावामध्ये २ शेतकरी शेळीपालन करीत होते, आत्ता १४ शेतकरी शेळीपालन करीत आहेत. पूर्वी ३ शेतकरी दुग्धवयवसाय करीत होते आत्ता त्यांची संख्या ७ शेतकरी आहेत, व दुबार पीक २ शेतकरी घेत होते, आत्ता ३४ शेतकरी दुबार पीक घेत आहेत हे पाहून जिल्हाधिकाऱ्यांना आनंद झाला व त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले. जिल्हाधिकाऱ्यांनी गावभेटी दरम्यान गाव विकास समितीने तयार केलेला गाव विकास आराखडा, गावचा सामाजिक व भौगोलिक नकाशा याची पाहणी केली तसेच स्वप्नातील गाव प्रक्रिये मध्ये करण्यात आलेली कामे , विकासासाठी केलेलं प्रयत्न त्यात आलेल्या अडचणी स्वदेस फौंडेशन दिलेली साथ शासकीय कामांचा पाठपुरावा समजून घेतला.