100 वा वाढदिवस तरीही प्रकृती ठणठणीत, श्रवणशक्ती थोडी कमजोर पण स्मरण शक्ती दांडगी!

पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर

माणगांव तालुक्यातील पाटणूस पंचक्रोशीतील म्हसेवाडीचे नाना सावंत यांना नुकतीच 100 वर्ष पूर्ण झाल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा 100 वा वाढदिवस अगदी धूमधडक्यात साजरा केला.

मुंबई येथे नाना अग्नीशमन दलात कार्यरत होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी गावी येणे पसंत केले. गावी येण्यापूर्वी त्यांनी जोतिष विद्या आत्मसात केली होती. शिवाय परमार्थाचा मार्ग स्वीकारल्याने सातत्याने ते आळंदी व पंढरपूरची वारी करीत असत. गावी भातशेती असल्याने त्यांनी शेती वाडीत सुध्दा लक्ष दिले. जोतिष विद्या येत असल्याने त्यांनी विनामूल्य लोकांची सेवा केली. गावी राहून सुध्दा मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष दिल्याने त्यांची मुले नोकरी व्यवसायात सक्षम झाली. स्वतःच्या पायावर उभी राहिली. त्यामुळे आज त्यांची नातवंडे शिकून सवरून नोकरी धंद्यात सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला मुले, सुना, नातवंडे आणि पाटणूस पंचक्रोशीतील ग्रामस्थ त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होते.

पंढरपूर येथे सातत्याने येणे-जाणे असल्याने पंढरपूर मधील एक नामवंत कीर्तनकार त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहून त्यांनी नानांसाठी कीर्तन सेवा दिली.

अग्नी शमन दलात कार्यरत असताना फार मोठ्या संकटाचा सामना करून त्यांनी स्वतःला सुरक्षित ठेवले. हकीकत अशी की दुसरे महायुद्ध संपल्या नंतर 1944 साली ब्रिटिश सरकारची युद्ध सामुग्रीने भरलेली एक तीन मजली जहाज मुंबईच्या दिशेने निघाले होते.त्यात स्फोटके होती. ती निकामी करण्यासाठी जहाज मुंबई च्या किनारी लागण्यापूर्वीच जहाज मधिल रसायनांचे स्फ़ोट होऊ लागल्याने जहाज मधिल अनेक कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमावावे लागले. जहाज मधिल आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नी शमन दलाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. ती 14 जणांची टीम होती त्यामध्ये नाना सावंत सुध्दा होते. आग विझवत असतांना जहाजातील अग्नी तांडव पाहून अनेकांनी स्वतःला समुद्रात झोकून दिले. नाना सावंत पट्टीचे पोहणारे होते. त्यांनी सुध्दा मग समुद्रात उडी घेतली. एका फळीचा आधार घेऊन ते दोन दिवस समुद्रात लाटांचा प्रतिकार करीत समुद्र किनारी पोहचले व त्यांनी मोठ्या धाडसाने स्वतःला वाचविले. आणि इतक्या मोठ्या संकटातून वाचलेल्या नानांनी आज वयाची 100 वर्षे पार केली.

Popular posts from this blog