वृद्ध महिलेचे दागिने लुटून हत्या!
पाटणूस ग्रामपंचायत हद्दीत म्हसेवाडीतील घटना
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
माणगांव तालुक्यातील पाटणूस ग्रामपंच्यायत हद्दीत म्हसेवाडी येथे दिवसा ढवळ्या साधारण दुपारी 2.5 च्या दरम्यान घरात एकट्याच राहणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिच्या कानातील, गळ्यातील, हातातील बांगड्या, बोटातील अंगठी असा एकूण तीन लाख रु. किंमतीचा ऐवज चोरांनी लुटला व महिलेने आपल्याला ओळखू नये म्हणून तिच्या घरातील पाण्याने भरलेल्या टब मध्ये तोड बुडवून निर्दयी पणे हत्या केली व अज्ञात मारेकरी पसार झाले. मंगळवारी दुपारी अडीच ते साडेतीनच्या दरम्यान घडलेल्या या घटनेची माहिती माणगाव पोलिसांना कळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते, उप निरीक्षक अस्मिता पाटील, हेड कॉन्स्टेबल प्रशांत पाटील, लाला साहेब तोरणे व पोलीस पाटील प्रदीप म्हामुणकर तातडीने घटना स्थळी पोहचले.पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार श्रीमती संगीता श्रीरंग सावंत वय (69) या म्हसेवाडी येथील आपल्या घरी एकट्याच रहात होत्या. मुंबई येथे त्यांची मुले व नातलग असल्याने त्या मुंबई व म्हसेवाडी येथे येऊन जाऊन रहात होत्या. मुंबई येथून त्या महाशिवरात्री साठी आपल्या म्हसेवाडी येथील घरी आल्या होत्या. संगीता सावंत यांचे घर गावातील शेवटचे घर असून तेथून पुढे जंगल भाग आहे. मंगळवारी दुपारी अडीच ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्या घरात एकट्याच असल्याचा गैर फायदा घेत अज्ञात मारेकऱ्याने त्यांच्या अंगावरचे दागिने ओरबाडून त्यांना पाण्याच्या टबात बुडवून त्यांची हत्या केली.
संगीता सावंत यांचा मुलगा विनोद श्रीरंग सावंत रा. मुंबई वय 47 वर्ष यांनी माणगाव पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असून कॉ. मु. रजि. नं.43/2023 भा.दं.वि.स. कलम 302, 394, 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. माणगांव पोलीस गुन्हेगारांचा कसून तपास करीत असून म्हसेवाडी गावातून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून माणगांव पोलीस अधिक तपास करीत आहेत.