नागोठणे विभागात बेकायदा मटका जुगार राजरोसपणे सुरु
मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी
नागोठणे विभाग परिसरात अनेक ठिकाणी अवैध बेकायदेशीर मटका जुगार राजरोसपणे सुरु असून या अवैध धंद्यान जणू सुगीचे दिवस आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नागोठणे विभागातील ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील वाकण मार्गानजीक सुरु असलेल्या बेकायदेशीर जुगार क्लबमुळे रात्री उशिरापर्यंत मोठया प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरु असते. तसेच नागोठणे कोळीवाडा रिक्षा स्टॅन्ड नजीक मटका ओपन व क्लोज या प्रमाणे आकडे लावून खेळला जातो. ओपन आकडा लागला तर लालसेपोटी आलेला पैसा क्लोज अकड्यात लावला जातो, परंतु क्लोज मध्ये आकडा न लागल्यास मिळालेल्या रकमेलाही मुकावे लागते. कमी अवधीत जास्त पैसे मिळवण्याच्या हव्यासात तरुण वर्ग या जुगार व मटक्याच्या पूर्ण आहारी गेल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेलेआहेत. अशा अवैध धंद्यांना आशिर्वाद कुणाचा? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. याबाबत तातडीने कारवाई करून स्थानिक पोलिसांनी लवकरात लवकर हे अवैध धंदे बंद करावेत व अनेकांचे संसार उद्धवस्त होण्यापासून वाचवावेत अशी मागणी नागरिक करत आहेत.