ऐनघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत बालसई (कुरेशी नगर) येथे भगतगिरी बुवाबाजी करणाऱ्यांचा धंदा तेजीत!
भाई नावाच्या भगतांची टोळी अंधश्रद्धेने गुरफटलेल्या लोकांची करतेय लुटमार!
रायगड : प्रतिनिधी
जुन्या रूढी परंपरा मोडीत काढत आपण नव्या युगात पदार्पण केलेले आहे. परंतु आजची स्थिती पाहता आपला समाज आज देखील अंधश्रद्धेच्या चक्रव्यूहात गुरफटत चालल्याचे दिसून येत आहे. आजच्या स्थितीत अंधश्रद्धेचे अनेक प्रकार आपल्या सभोवताली घडताना दिसत असतात. देवाचा कोप, भूत, गुप्तधन, चमत्कार, मंत्र, अवतार, पूर्वजन्म-पुनर्जन्म, अपशकुन, नरबळी, करणी यांसारखे अंधश्रद्धेचे प्रकार अनेक ठिकाणी पाहण्यात आलेले आहेत. या अंधश्रद्धेमुळे अनेकांचे बळी गेलेले आहेत. तरी अंधश्रद्धेचा चष्मा फेकून प्रत्येकाने सत्य परिस्थितीला सामोरे जाणे ही काळाची गरज आहे!
अंधश्रद्धेचा असाच एक प्रकार ऐनघर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बालसई येथील कुरेशी नगर दिसून आलेला आहे. येथे भगतगिरी-बुवाबाजीचे प्रकार घडत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारची भिती दाखवून भगतगिरी द्वारे त्यांची संकटातून सुटका करण्याचे आमीष दाखवून भोंदू बाबांनी त्यांची आर्थिक लुबाडणूक सुरू ठेवल्याचे उघडकीस आलेले आहे. येथे लोकांचा अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्याकडून ५०० रूपये घेतले जातात आणि एखाद्या समस्येवर भगतगिरीद्वारे तोडगा काढण्यासाठी ५००० ते ५०,०००हजार रूपयांची मागणी करून लोकांची लुबाडणूक केली जात असल्याची चर्चा आहे. तरी या परिसरातील नागरिकांनीही याप्रकरणी जागृत होऊन हा अंधश्रद्धेचा प्रकार थांबविणे ही काळाची गरज आहे. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याकडे तातडीने लक्ष देऊन हा घृणास्पद प्रकार थांबवावा अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.