अवैध ओव्हरलोड वाहतुक आठ दिवसात बंद न केल्यास जन आंदोलनाचा इशारा

रोहा : किरण मोरे

रायगड जिल्ह्यामध्ये अनेक अवैध ओरलोड वाहतुक होत असून त्याकडे संबंधित प्रशासनाचा कानाडोळा व दुर्लक्ष होत आहे. सदर ओव्हरलोड वाहतूकीमध्ये कॉईलचे कन्टेनर, कोळश्याचे मोठे ट्रक व लोखंडाची गोटी व कच्चा माल मोठ्या प्रमाणात चोवीस तास रायगड जिल्ह्यामध्ये वाहतूक होते. त्यामध्ये रोहा सानेगाव येथून कोळश्याची वाहतूक, इस्पात रेवदंडा येथून पक्कया लोखंडाची वाहतूक केली जाते. तसेच वडखळ कडून इस्पातकडे कच्च्या लोखंडाची वाहतूक केली जाते. त्याचप्रमाणे वडखळ कडून रोहा इंडस्ट्रिजमध्ये राजरोसपणे ओव्हरलोड कोळश्याची हतूक केली जात आहे. ही ओव्हरलोड वाहतूक येत्या आठ दिवसांत बंद न केल्यास जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते किशोरभाई म्हात्रे, मनोहर सुटे, जितेंद्र धामणसे, ओमप्रकाश मोदी, भूपेंद्र बामणे, योगेश कदम, निमेश वाघमारे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रायगड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

रविवार दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी अशाच प्रकारे सानेगाव जेट्टीकडून ओहरलोड भरलेला कोळश्याचा ट्रक नागोठणे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भीसे खिंडीमध्ये आल्यानंतर नागोठणे कडून जाणाऱ्या मोटारसायकल चालकास चुकीच्या साईटला येऊन कठडा तोडून मोटारसायकल स्वारास धडक देवून अंदाजे 50 मीटर दरीमध्ये खोलवर गेल्याने मोठा अपघात झाला. यामध्ये मोटार सायकल स्वाराचा जागेस मृत्यू झाला. त्यास काढण्यासाठी भरपूर अडथळा निर्माण होत होता. यावेळी हायड्राचा सुद्धा वापर करण्यात आला. परंतू तो ट्रक न निघाल्याने क्रेन आणून ट्रक उचलून मयत धर्मा शिगवण यांचा मृतदेह काढण्यात आला. सबंधित ड्रायव्हरने दारूचे सेवन केले असल्याचे समजले. यापूर्वीही या अवैध ओहरलोड वाहतूकीमुळे अनेक अपघात झाले असून ड्राव्हरच्या निष्काळजीपणाने अनेकांना प्राण गमवावे लागलेले आहे. या सर्व बाबींचा विचार करून जर येत्या आठ दिवसांमध्ये ओहरलोड वाहतूकी विरूध्द योग्य ती कारवाई न केल्यास आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत. या सर्व बाबींचा विचार करून आपण योग्य ती कारवाई करावी अन्यथा संपूर्ण होणाऱ्या परिणामांस आपण व संबंधित प्रशासन जवाबदार राहाल याची नोंद घ्यावी असे निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रायगड यांना देण्यात आलेले आहे.

Popular posts from this blog