खरवली ग्रामपंचायत उपसरपंच स्वप्निल सकपाळ यांच्या विरोधात अविश्वास ठराव
अविश्वास ठरावावर उद्या २० सप्टेंबर रोजी मतदान
माणगांव : प्रमोद जाधव
माणगांव तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी ग्रामपंचायत म्हणजे खरवली ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीमध्ये मागील ५ वर्षांमध्ये अनेक राजकीय स्थित्यंतरे घडली आहेत आणि आगामी जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून अजूनही राजकीय उलथापालथ होऊ शकते.
माणगांव तालुक्यातील या खरवली ग्रामपंचायतीमध्ये सदस्य संख्या ९ तर थेट जनतेतून सरपंच १ अशी ९+१ -१० अशी सदस्यसंख्या आहे. गेले साडेतीन वर्षे स्वप्निल सकपाळ हे खरवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाचा कार्यभार संभाळत आहेत. मात्र स्वप्निल सकपाळ यांच्या विरोधात खरवली ग्रामपंचायत मधील विद्यमान ७ सदस्यांनी १४ सप्टेंबर रोजी अविश्वास ठराव दाखल केला आहे. या अविश्वास ठरावाच्या अनुषंगाने २० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता ग्रामपंचायत कार्यालय खरवली येथे ग्रामपंचायत अधिनियम महाराष्ट्र १९५९ कलम ३५ पो. क.(२)व (३) अन्वये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेमध्ये अविश्वास ठराव आणलेल्या उपसरपंच स्वप्निल सकपाळ यांच्या बाजूने व त्यांच्या विरोधात किती सदस्य मतदान करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असून संपूर्ण माणगांव तालुक्याचे या खरवली ग्रामपंचायतीमध्ये घडणाऱ्या राजकीय घडामोडीवर लक्ष लागून राहिले आहे.