माणगांवमध्ये हायवेवर वक्रतुंड हॉटेलच्या वर अवैध जुगाराचा क्लब सुरु, लायसन्स लॉजींगचे की जुगाराचे?
जुगाऱ्यांचा असा थाट, मोफत मिळतेय मटण-मच्छीचे ताट!
अवैध धंदा तातडीने बंद करण्याची नागरिकांची मागणी
रायगड : समीर बामुगडे
माणगांव शहरात मुंबई-गोवा महामार्गावर वक्रतुंड हॉटेलच्या वर अवैध जुगार क्लब राजरोसपणे सुरु असून यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. विशेष म्हणजे हा अवैध जुगार क्लब लॉजींगच्या जागेत सुरू असल्यामुळे लायसन्स लॉजींगचे, की जुगाराचे? असा प्रश्न या परिसरातील नागरिकांसमोर उभा राहिलेला आहे. त्यामुळे तातडीने हा अवैध जुगार क्लब बंद करण्यात यावा अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.
येथे जुगार खेळण्यासाठी येणाऱ्यांना येथे चिकन, मटण, मच्छी, गुटखा, सिगारेट फ्री मध्ये मिळत असल्याने येथे जुगाऱ्यांची चांगलीच चंगळ होत असल्याची चर्चा माणगांव तालुक्यात रंगली आहे. सदरच्या क्लबमध्ये माणगांव तालुक्यातील अनेक शौकीन जुगार खेळण्यासाठी गर्दी करीत आहेत. अशा जुगार क्लबमुळे अनेक कुटूंब उद्ध्वस्त होत असून शासनाची कोणतीही परवानगी या क्लबला नसून बेकायदेशीरपणे व राजरोसपणे हा जुगार क्लब सुरु असून माणगांव पोलीसांनी या जुगार क्लब विरूद्ध तातडीने कारवाई करून तो कायमचा बंद करावा अशी मागणी माणगांव परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.