नदी संवर्धनच्या जागेत दुकानगाळे बांधून विक्री करण्याचे पुढाऱ्यांचे प्रयत्न

मुख्याधिकारी रोहा यांनी जागेवर जाऊन केली कारवाई, अतिक्रमण हटविण्यासाठी दिली दोन दिवसांची मुदत

नदीसंवर्धन प्रकल्पाचे विद्रुपीकरण थांबवा; सिटीझन फोरमचे पालिकेला पत्र 

रोहा : समीर बामुगडे 

रोहयाच्या कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाच्या जागेत दुकानगाळे बांधून त्यांची बेकायदेशीरपणे विक्री करण्याचे प्रयत्न काही पुढाऱ्यांनी येथे केले आहेत. याबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त होताच रोहा नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांनी सोमवारी जागेवर जाऊन कारवाई करीत अतिक्रमण हटविण्यासाठी 2 दिवसांची मुदत संबंधितांना दिली. तर नदीसंवर्धन प्रकल्पाच्या जागेचे होणारे विद्रुपीकरण थांबवावे अशी मागणी  सिटीझन फोरमने पालिकेला पत्र पाठवून केली आहे. 

रोह्याच्या कुंडलिका नदीतीरी सुमारे 30 कोटी रुपयांहुन अधिक निधी खर्च करून नदी संवर्धन प्रकल्पाचे काम करण्यात आले आहे. गेल्या सप्ताहात या प्रकल्पाच्या जागेमध्ये हॉटेल रोहा प्राईड समोरील भागात कायमस्वरूपी दुकान गाळे उभे करण्यात आले होते. दरदिनी तेथे ही दुकाने वाढत चालली होती. रोहा शहरात हे बेकायदेशीर गाळे उभे करून त्यांची 85 हजार रुपयांना विक्री केली जात असल्याची माहिती सोशल मीडियावर पसरताच नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागला, यामध्ये दोन मोठ्या पुढाऱ्यांचा सहभाग असल्याने मुख्याधिकारी कारवाई करीत नसल्याची चर्चा शहरात सर्वत्र पसरली. दि. 23 ऑगस्टला रोहा नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना यासंबंधित पत्र पाठविण्यात आल्यानंतर पालिकेची सूत्रे हलली, शुक्रवारी पालिके तर्फे संबंधितांना 2 दिवसांची मुदत देणारी नोटीस देण्यात आली होती, सोमवारी सकाळी रोहा सिटीझन फोरमने मुख्याधिकारी रोहा यांना पत्र पाठवून या बेकायदेशीर टपऱ्यांवर आपण तात्काळ कारवाई करावी व हे अतिक्रमण दूर करून नदी संवर्धन प्रकल्पाचे करण्यात येणारे विद्रुपीकरण तातडीने थांबविण्यात यावे अशी मागणी फोरमचे अध्यक्ष नितिन परब व निमंत्रक प्रदीप तथा आप्पा देशमुख यांनी केली. दरम्यान आज मुख्याधिकारी धीरज चव्हाण यांनी पालिकेचे कर्मचारी, पोलीस बळ आणि जेसीबी सोबत घेऊन प्रत्यक्ष जागेवर जाऊन कारवाई करण्याचे प्रयत्न केले. परंतु यावेळी संबंधितांनी व टपरीधारक यांनी सर्व माल व टपऱ्या 2 दिवसात उचलून नेण्याचे कबूल केल्याने सदर कारवाई दोन दिवस स्थगिती ठेवण्यात आल्याचे मुख्याधिकारी चव्हाण यांनी सांगितले आहे. या अतिक्रमणामुळे नदी संवर्धन प्रकल्पाच्या जागेचे विद्रुपीकरण झाले असून या प्रकल्पाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. चव्हाणांसारखे मुख्याधिकारी पालिकेत कार्यरत असताना अशी अतिक्रमणे उभी राहणे योग्य नसल्याचे फोरमचे नितिन परब व आप्पा देशमुख यांनी यावेळी सांगितले आहे.

Popular posts from this blog