ग्रामपंचायत पाटणूसच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा

पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर

देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा या आवाहनास प्रतिसाद देऊन संपूर्ण देशभरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.याच पाश्र्वभूमीवर पाटणूस ग्रामपंचायत यांच्या वतीने आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून हर घर तिरंगा या मोहिमेविषयी प्रभातफेरी काढून, घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली.महिला मेळाव्याचे आयोजन करून सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हर घर तिरंगा मोहिमेविषयी जनजागरण करण्यात आले. ग्रामपंचायतच्या वतीने रायगड जि.प.शाळा पाटणूस, बहिरीवाडी,म्हसेवाडी,गोळेवाडी, कुंडलिका विद्यालय पाटणूस या शाळांमध्ये शालेय पातळीवर चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व, सामान्यज्ञान अशा स्वरुपाच्या स्पर्धा घेण्यात आल्या.13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये घरोघरी तिरंगा उभारून राष्टध्वजाला मानवंदना देण्यात आली. शाळा व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ध्वजसंहितेचे पालन करून तीनही दिवस मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले.आज अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून ग्रामपंचायतच्या वतीने परिसरातील सेवानिवृत्त सैनिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणे केली. वैभवी कडू यांनी ये मेरे वतन के लोगो या गीताचे गायन करून सभागृहातील वातावरण देशप्रेमाने भारावून टाकले. स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाचे निमित्त साधून शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण करून सन्मान करण्यात आले.या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सेवानिवृत्त सैनिक, पोलीस अधिकारी, पत्रकार, ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिक्षक, कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी स्व.विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog