युवानेते महेशदादा ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश, रा.जि.प. पालेखुर्द शाळेत शिक्षक हजर
गटविकास अधिकारी आणि गटशिक्षण अधिकारी यांच्या कार्यतत्परतेचे स्वागत - महेशदादा ठाकूर
रोहा : समीर बामुगडे
रोहा तालुक्यातील पालेखुर्द येथील रा.जि.प. शाळेत शिक्षक नियुक्त करण्याची मागणी युवानेते महेशदादा ठाकूर यांनी केली होती. रोहा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभदा पाटील आणि गटशिक्षणाधिकारी मेघना धायगुडे यांनी त्यांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन पालेखुर्द शाळेवर नवीन शिक्षीकेची नियुक्ती केली.
रोहा तालुक्यातील पालेखुर्द रा.जि.प. प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग असून त्यामध्ये एकूण २९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु एकूण ४ वर्ग आणि इतकी विद्यार्थी संख्या असताना देखील या शाळेवर एकच शिक्षीका कार्यरत होती. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचे काम एकच शिक्षीका करीत असल्यामुळे येथे विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे शिक्षण मिळेल का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. याउलट रोहा तालुक्यात अनेक ठिकाणी अशाही शाळा आहेत की जिथे विद्यार्थी संख्या कमी असताना देखील शिक्षकांची संख्या जास्त आहे. परंतु पालेखुर्द प्राथमिक शाळेकडे शासनाचे दुर्लक्षच झाल्याचे दिसून येत आहे असा प्रश्न युवानेते महेशदादा ठाकूर यांनी उपस्थित केला होता.
शिवाय मराठी शाळेकडे मुलांचा ओढा वाढावा यासाठी सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सतत प्रयत्न गावात करीत आहेत. तरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी दुसरा शिक्षक तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी युवा नेते महेशदादा ठाकूर यांनी दाखल केलेल्या तक्रारीद्वारे केली होती. त्यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेण्यात येऊन येथे नवीन शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, पालेखुर्द शाळा व्यवस्थापन समिती यांनीही गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यतत्परतेचे स्वागत केले आहे.