माती चोरी प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक
दोन दिवसांची पोलीस कोठडी, उर्वरित आरोपींवर देखील कारवाईची मागणी
रोहा : समीर बामुगडे
रोहा तालुक्यातील चणेरा विभागात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या गौण खनिज चोरीबाबत प्रसारमाध्यमांनी सातत्याने आवाज उठविला होता. तळवडे येथील मनिषा बांदल या महिलेच्या शेतातील माती एका वीटभट्टी व्यावसायिकाने विना परवानगी उत्खनन करून नेली होती. याबाबत त्या महिलेने मागील दोन महिने शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा चालवला होता. या माती चोरी करणाऱ्यांच्या विरोधात भादवि कलम ३७९, ४२७ व ३४ अन्वये गुन्हा दाखल होऊन देखील आरोपींना अटक करण्यात आली नव्हती. अखेर १३ जुलै रोजी या प्रकरणातील मुख्य आरोपी मुजमिल गिते याला रोहा पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात मुजमिल गिते, मुदस्सर गिते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून माती उत्खनन करण्यासाठी वापरण्यात आलेला जेसीबी एमएच १५ सीयू ५६१३ वरील चालक, तसेच डंपर क्रमांक एमएच ०४ एफजे ३२६७ व एमएच ०४ - ७१६७ वरील चालक या सर्वांना आरोपी करण्यात आले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गौण खनिज चोरी होत असताना देखील महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांची या व्यावसायिकांशी असलेल्या तडजोडीमुळे कोणताही गुन्हा दाखल होत नव्हता. पण स्वतःच्या शेतातील माती चोरून नेणाऱ्याला जाब विचारायला गेल्यावर संबंधित महिलेला दुरुत्तरे करण्यात आली. यामुळे संतापलेल्या महिलेने तहसीलदार, पोलीस निरीक्षक, प्रांताधिकारी रोहा तसेच जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. मुख्य आरोपी हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याने गुन्हा नोंद होऊन देखील आरोपीला अटक करण्यात आली नव्हती. पण राज्यात सत्तांतर होताच वेगाने चक्रे फिरली आणि मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील अन्य आरोपींना देखील अटक व्हावी आणि माती चोरीच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेले जेसीबी, डंपर देखील जप्त करण्यात यावे अशी मागणी पुढे येत आहे.