पत्रकारांच्या सन्मानाने भारावले धाडसी वीर
धाडसी वीरांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सन्मान आवश्यक - किशोर जैन
नागोठणे : महेंद्र माने
पोलीस किंवा रेस्क्यू पथक यांनी एखादी धाडसी कारवाई केली तर त्यांचा जाहीर सन्मान केला जातोच असे नाही. परंतु अशा धाडसी वीरांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याबरोबर मनोधैर्य वाढविण्यासाठी नागोठणे पत्रकार संघाने पुढाकार घेत सर्वांचा सन्मान केला. या कार्यक्रमाच्या वेळी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर जैन यांनी अशा धाडसी वीरांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांचा योग्य तो सन्मान होणे आवश्यक असल्याचे सांगितले. पत्रकार संघाने केलेल्या या सन्मानाने धाडसी वीर अक्षरशः भारावून गेले.
गेल्या 12 आणि 13 जुलै रोजी परिसरातील चिकणी आणि पळस येथे मानवी जीवांबरोबर मुक्या प्राण्यांचेही जीव वाचविण्याची धाडसी कामगिरी स्थानिक पोलिसांसह कोलाड येथील वायडर वेस्ट ॲडव्हेंचरच्या सदस्यांनी पार पाडली आणि होणारे दोन मोठे अनर्थ टाळण्यास मोलाची मदत केली. या सर्व धाडसी वीरांचा नागोठणे पत्रकार संघाने तुळशीचे रोप, गुलाब पुष्प, श्रीफळ आणि प्रशस्तिपत्र देऊन पोलीस ठाण्याच्या श्री दत्त मंदिरात समारंभपूर्वक सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर जैन यांनी धाडसी वीरांचे कौतुक करताना असा समारंभ आयोजित केल्याबद्दल पत्रकार संघाला धन्यवाद दिले. अशा प्रकारची कामगिरी करणाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांचा योग्य तो सन्मान होणे आवश्यक असल्याचे सांगून 23 जुलै 1989 मध्ये आलेल्या महापुराच्या आठवणी सांगताना आपत्कालीन परिस्थितीत रेस्क्यू पथकाची गरज जैन यांनी अधोरेखीत केली.
पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनीही रेस्क्यू पथकाची उपस्थिती आपत्कालीन प्रसंगात महत्त्वाची ठरत असल्याचे सांगितले. तर धाडसी कारवाईत सहभागी झालेले पोलीस उपनिरीक्षक नारायण चव्हाण यांनी भाषणात 1989 च्या महापुराचा अनुभवलेला थरार कथन करताना सक्षम रेस्क्यू यंत्रणा उपलब्ध नसेल तर कसे हतबल व्हावे लागते याचा स्वानुभव सांगितला. रायगड जिल्हा भाजपचे माजी उपाध्यक्ष किशोर म्हात्रे यांचेही समयोचित भाषण झाले. तर प्रास्ताविकात पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय भिसे यांनी नागोठणे आणि परिसरात पुराची टांगती तलवार कायम असल्याने येथेही एखादे रेस्क्यू पथक असावे आणि त्यासाठी ‘वायडर’चे महेश सानप यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. तसेच पत्रकार संघाने आतापर्यंत राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन नारायण म्हात्रे यांनी केले.
यावेळी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, रोहे पं.स.मा.सदस्य बिलाल कुरेशी, मा. सरपंच विलास चौलकर, शिवसेनेच्या महिला उपजिल्हा संघटक दर्शना जवके, भाजपचे तालुका शिक्षण सेल अध्यक्ष अशोक अहिरे, लायन्स क्लबचे अध्यक्ष अनिल गीते, काँग्रेसचे शहराध्यक्ष अशपाक पानसरे, शिवसेना शहर संघटक प्रणिता पत्की, शाखाप्रमुख धनंजय जगताप, हभप बापू महाराज रावकर, हभप विजय महाराज शहासने, पोलीस पाटील बबन शिंदे आणि विठ्ठल शिंदे, पत्रकार राज वैशंपायन, संदेश गायकर, मंजुळा म्हात्रे, पोलीस कर्मचारी आदींसह पत्रकार संघाचे सचिव महेंद्र माने, खजिनदार पुरुषोत्तम घाग, सहसचिव मनोहर सकपाळ, सदस्य मिलिंद घाग, संकल्प माने, निलेश म्हात्रे तसेच विभागातील नागरिक उपस्थित होते.
या शूरवीरांचा झाला सन्मान
पोलीस पथक : पोलीस उपनिरीक्षक नारायण चव्हाण, हवालदार विनोद चव्हाण, गणेश भोईर,पोलीस नाईक सचिन भोईर, गंगाराम ढुमणे, नितीश पाटील व निलेश कोंढारे,पोलीस शिपाई राम ठाकूर व सत्यवान पिंगळे
वायडर वेस्ट ॲडव्हेंचर पथक : महेश सानप, रोशन सानप, हरेश सानप, पप्पू पवार, वेदांत महाडिक आणि विकास चांद