भागाड एम.आय.डी.सी. परिसरातत माकडाचा धुमाकूळ!
शिवभोजन थाळी केंद्रात माकड घुसल्याने ग्राहकांची पळापळ
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
माणगाव तालुक्यातील भागाड एम.आय.डी.सी. मध्ये एका माकडाने धुमाकूळ घातला असून हा माकड अनेकांचे नुकसान करीत आहे. या माकडाने अनेकांच्या घरांवरील पत्रे तोडले असून त्याला जर हटकले तर तो लगेच अंगावर धावून येतो. तो अनेकांना चावला देखील आहे. त्यामुळे त्याने या परिसरात आपली दहशत निर्माण केली आहे.
जवळपास माणसाएवढा आकाराने मोठाअसल्याने तो जवळ आल्यास माणसांची पळापळ होते. मंगळवार दि.12 जुलै 2022रोजी हा माकड राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षा देविका पाबेकर यांच्या शिवभोजन केंद्रात घुसला. यावेळी कामगारांची दुपारी 1 ते 1.30 अशी जेवणाची वेळ होती. त्यामुळे केंद्रात कामगारांची गर्दी होती. परंतु त्याच वेळेस माकड केंद्रात घुसून कामगारांच्या ताटातील चपात्या पळवू लागला व इकडे तिकडे उड्या मारू लागला. अगोदरच लोकांमध्ये माकडाची दहशत होती. त्यामुळे प्रत्यक्ष समोर माकडाला बघताच जेवणासाठी आलेल्या कामगारांची एकच पळापळ झाली आणि क्षणार्धात शिवभोजन केंद्र खाली झाले. जेवणाची केवळ अर्धा तासच सुट्टी असल्याने व परत कामगार न परतल्याने शिवभोजन केंद्रातील जवळपास 70 लोकांचे जेवण फुकट गेले. ताटात वाढलेले जेवण परत घेता येत नसल्याने अन्न फेकून द्यावे लागले. सदरचा माकड रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनांचे टायरही चावून टाकतो त्यामुळे वाहन चालकही या माकडाच्या त्रासाला कंटाळले आहेत. वन अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या माकडाला जे्रबंद करून दूरच्या जंगलात सोडून द्यावे अशी या परिसरातील नागरिकांची प्रमुख मागणी आहे.