रेस्क्यू पथकामुळे वाचले बकरी मालकासह 20 बकऱ्या व एक श्वानाचे प्राण
नागोठणे पोलीस व रेस्क्यू पथकावर अभिनंदनाचा वर्षाव
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे येथील अंबा नदीने मंगळवार 12 जुलै रोजी सायंकाळी जोरदार पावसात धोक्याची पातळी ओलांडली होती, त्यामुळे पुराचे पाणी शहरासह आजूबाजूच्या परिसरातील काही भागात शिरले व वाढू लागले. त्या पुराच्या पाण्यात नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिकणी गावातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल गुलमोहरच्या मागील एका वाड्यात अडकलेल्या 20 बकर्या व एक श्वानासह बकरी मालकाला वाचविण्यात पोलीस व रेस्क्यू पथकाने यशस्वी कामगिरी केली आहे. यांच्या धाडसी कामगिरीबद्दल विभागातून या पथकाचे अभिनंदन होत आहे.
अंबा नदीने मंगळवार रोजी सायंकाळी जोरदार पावसात धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे पुराचे पाणी शहरासह आजूबाजूच्या परिसरातील काही भागात शिरले व वाढू लागले. त्याच सुमारास साधारण 4.30 ते 5.00 च्या दरम्यान नागोठणे पोलीसांना फोन आला की, चिकणी येथील हॉटेल गुलमोहरच्या मागील वाड्यात बकर्यासह एक व्यक्ती पुराच्या पाण्यात अडकल्या आहेत. ही बातमी समजताच पोलीसांनी तत्परतेने कोलाड येथील महेश सानप यांना याची कल्पना देताच त्यांनी तातडीने रेस्क्यू पथक पाठविले. पथक घटनास्थळी पोहचताच पथकाचे जवान व पोलीसांनी सदर ठिकाणी जाऊन वेगात वाहणार्या पाण्यातून बोटीने 6 ते 7 फेर्या मारून वाड्यातील बकरी मालक संतोष नेपाळी व त्याच्या 20 बकर्या व एक श्वान या सर्वांना सुरक्षित ठिकाणी आणले. तहसीलदार कविता जाधव व पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू पथकाचे रोशन सानप, हरेश सानप, पप्पू पवार, विकास नेगी या जवानांसह पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विनोद पाटील व गणेश भोईर, पो.ना. नितीश पाटील व निलेश कोंडारे, पो.शि.सत्यवान पिंगळे यांनी यशस्वी कामगिरी केली. धाडसी कामगिरीबद्दल विभागातून नागोठणे पोलीस व रेस्क्यू पथकाचे अभिनंदन होत आहे.
अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याचे रोहा तहसिलदार कविता जाधव यांना समजताच त्यांनी तातडीने पहाणी करण्यासाठी नागोठणे शहर व परिसरात आल्या असता त्यांना सदरील ठिकाणी पुराच्या पाण्यात बकरी मालक व त्याच्या बकर्या अडकल्याचे समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन या सर्वांना सुरक्षित ठिकाणी आणेपर्यंत भर पावसात घटनास्थळी उपस्थित राहिल्या.