मांदाड खाडीपात्रात वाळू माफीयांचा धुमाकूळ, सक्शन पंपाद्वारे मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन!
रोहा : समीर बामुगडे
तळा तालुक्यात कुडे आणि मांदाड खाडीपात्रात राजरोसपणे सक्शन पंपाद्वारे वाळू उख्खनन केले जात असून याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी तक्रारी देऊनही महसूल विभागाकडून त्यांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली जात असल्याने महसूल विभागाचे वाळूमाफीयांसोबत "अर्थपूर्ण" संबंध असल्याचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अवैध वाळू उत्खननामुळे मांदाड आणि कुडे खाडी आज विद्रूप होताना दिसत आहे. तळा शहरापासुन १० किलोमीटर अंतरावर कुडे आणि मांदाड लगत अवैध वाळू वाहतुकदारांमुळे खारबंदिस्तीचे नुकसान होऊन खाडी पात्राचे सर्व खारे पाणी शेतीत घुसून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी तळा तहसिलदारांकडे मुश्ताक दांडेकर यानी अनेक वेळा तक्रारी दिल्या होत्या. पण त्यावर कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. येथे मोठ्या प्रमाणात वाळू उख्खनन होत असल्याने याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.