नागोठणे येथे राज्यसभा निवडणुकीचा विजयोत्सव निराधार महिलेला भेट वस्तु देऊन केला साजरा
शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी घेतली महिलेची वैद्यकीय जबाबदारी
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे येथील भाजपाच्या वतीने नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या चुरशीत भाजपाने मिळविलेल्या यशाचा विजयोत्सव जय जयकाराच्या घोषणा,फटाक्यांच्या आताषबाजीत नागरिकांना मिठाई वाटप तसेच एका वयोवृद्ध निराधार महिलेला भेट वस्तु देऊन साजरा करण्यात आला. विजयाचे औचित्त साधून येथील शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी या निराधार महिलेची वैद्यकीय जबाबदारी घेतली. मोदी यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबाबत विभागातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमाला भाजपा उपजिल्हाध्यक्ष मारुती देवरे, भाजपा उपजिल्हाध्यक्षा श्रेया कुंटे,तालुका सरचिटणीस आनंद लाड, ज्येष्ठ नेते परशुराम तेलंगे, शहर अध्यक्ष सचिन मोदी यांच्यासह प्रियांका पिंपळे, रउफ कडवेकर, विठोबा माळी, तीरथ पोलसानी, शेखर गोळे, गौतम जैन, राजेंद्र देवरे, धनराज धुमाळे, यांच्यासह विभागातील भाजपा पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
या विजयोत्सवाची सुरुवात शहराध्यक्ष सचिन मोदी यांच्या कार्यालयातून येथील वत्सला वाघमारे या वयोवृद्ध निराधार महिलेला विणाभाभी मोदी यांच्या हस्ते साडी व भेट वस्तु देऊन करण्यात आली. त्यानंतर सर्व कार्यकर्ते हातात भाजपा झेंडे घेऊन देवेंद्रजी आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाऊन फटाक्याची आताषबाजी करीत नागरिकांना मिठाई वाटण्यात आली. यावेळी मारुती देवरे यांनी आजचा विजय हा देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विकास कामांमुळे झाला असून ते सर्वांना सोबत घेऊन विजयाची घोड दौड करीत असल्याचे सांगितले. आनंद लाड यांनी आजच्या विजयाने भाजपामध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे सांगितले.श्रेया कुंटे यांनी विजयाने उत्साह वाढला असल्याचे सांगितले. सचिन मोदी यांनी आजच्या विजयोत्सवाचे औचित्त साधून वत्सला वाघमारे यांचा सन्मान केला असून त्यांची संपूर्ण वैद्यकीय खर्चाची जबाबदारी मी उचलीत असून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगून येथील जेष्ठ नेते मारुती देवरे यांचे सामाजिक कार्य चांगले असून त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीत संधि दिली तर आपला विजय निश्चित असल्याचे मोदी यांनी सांगितले. निराधार महिलेची वैद्यकीय जबाबदारी घेतल्याबद्दल मोदी यांच्यावर विभागातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.