नागोठणे नगरीत वटपौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरी
नागोठणे : महेंद्र माने
ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमेंनिमित्त मंगळवार 14 जून रोजी येथील सी.के.पी. समाजाचे जुना रामेश्वर मंदिर व ब्राम्हण समाजाचे नवीन रामेश्वर मंदिर यांच्या समोर असलेले अवाढव्य वटवृक्षाच्या पारावर तसेच इतर ठिकाणी असलेल्या वडाच्या वृक्षाची येथील सौभाग्यवतींनी हिरव्या बांगड्या, शेंदुर, एकगळसरी, अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याची पाने, सुपारी, दक्षणा, गूळ, खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे वगैरे पाच फळे,, दुर्वा इत्यादी साहित्यासह हळद-कुंकू अक्षता वाहून मनोभावे पूजा करुन वडाला सुती दोरा गुंडाळीत पाच प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर एकमेकींना वाण देवून वटपौर्णिमा उत्साहात व भक्तिभावाने साजरी केली.वटपौर्णिमा म्हणजे नवीन लग्न झालेल्या महिलांना शृंगारासाठी पर्वणीच असते.
सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळविण्याकरिता यमराजाला भक्ती ने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळविले.ज्या वृक्षा खाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचे होते. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. याप्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाची पूजा करतात. वड हे देवतुल्य असे झाड असून तो दिवस ज्येष्ठ महिन्यातील पौणिमेचा होता. या दिवशी भारताच्या बऱ्याच भागात अजूनही सावित्री व्रत सौभाग्यवती स्त्रिया करतात. पती व्रता स्त्री कशी असावी याचा ‘सावित्री’ हा आदर्श समजला जातो आणि तिची स्मृती सर्व भारतीय स्त्रियांनी दीर्घ काळापासून जागृत ठेवली आहे. सावित्रीचे चरित्र लोकप्रिय असून त्याचे अनेक ग्रंथात वर्णन केले आहे.