नागोठणे एस.टी.बस स्थानकाचे डबक्यात रूपांतर
रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता? प्रवाशांत संभ्रम
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे येथील एस.टी. स्थानकाचे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळ्यात डबक्यात रूपांतर झाले आहे. नुकताच सुरू झालेल्या पावसाळ्यात स्थानकाच्या प्रवेशव्दारावरच भला मोठा खड्डा पडला असून एस.टी.बस स्थानकात ये-जा करणार्या प्रवाशांची मनस्थिती तळ्यात-मळ्यात झाली आहे. त्याचप्रमाणे स्थानकाच्या आवारात लहान-मोठे दगड निघाले असून ते उडून जखमी होण्याच्या भीतीने हजारो प्रवासी दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत.
रायगड जिल्हयातील नागोठणे हे शहर मध्यवर्ती व महत्वाचे आहे. या ठिकाणाहून मुंबई, ठाणे, वसई, बोरीवली, रोहा, मुरुड, कर्जत, खोपोली, नाशिक, पुणे त्याचबरोबर श्रीवर्धन, चिपळूण, रत्नागिरी तसेच कोकणात जाण्यासाठी सोयीचा मार्ग आहे. या स्थानकामधून दिवसभरामध्ये साधारण 145 ते 150 लोकल व जलद एस.टी.बसेस ये-जा करीत असून या सर्व बसेसमधून दररोज हजारो प्रवासी नागोठणे येथून प्रवास करीत असतात. यामध्ये शाळा/कॉलेजचे विद्यार्थी, महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. यावर्षीचा पावसाळा नुकताच चालू झाला असला तरीही पाहिजे तसा पाऊस पडला नसतानाही सुरुवातीलाच या स्थानकाच्या प्रवेशव्दारावरच भला मोठा खड्डा पडला असून त्याचे रूपांतर डबक्यात झाले आहे. तेथून ये-जा करताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत असून समोरून बस आली तर अंगावर खड्यातील पाणी उडणार या भीतीने तारांबळ उडत आहे. त्याचप्रमाणे स्थानकामध्ये जागो-जागी पावसाचे पाणी साठून त्याचे लहान मोठ्या खड्ड्यांचे डबक्यात रूपांतर झाले आहे. त्यामधुनच प्रवासी चढ-उतार करीत आहेत. यामध्ये महिला, लहान मुले व जेष्ठ नागरिकांना जास्त त्रास सहन कराव लागत असून प्रवाशांची अवस्था तळ्यात की मळ्यात अशी झाली आहे. या पाण्यातील खड्यांत महिला,लहान मूल किंवा जेष्ठ नागरिक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर काही उपाय योजना केली नाही तर प्रवेशव्दारावर व स्थानकात झालेल्या खड्ड्यांचे रूपांतर तलावात निश्चित होईल. त्याचप्रमाणे या स्थानकात सर्वत्र लहान-मोठे दगड-धोंडे निघाले असून ते बसच्या चाकात अडकून उडून प्रवाशी किरकोळ जखमी किंवा एखादा मोठा दगड उडाल्याने प्रवाशी गंभीर जखमी झाले; तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. दररोज साधारण हजारो प्रवाशी जीव मुठीत घेवून प्रवास करीत असलेल्या या स्थानकात आवश्यक त्या सुविधा का पुरविले जात नाहीत? याचा विचार प्रवाशी वर्ग करीत असून लवकरात लवकर स्थानकातील खड्डे बुजवून बाहेर आलेले दगड बाजूला करण्याची मागणी प्रवाशी वर्गातून करण्यात येत आहे.
याबाबत विभागीय कार्यालयात पत्र व्यवहार करण्यात आला असून, विभागीय सापत्य अभीयंता यांच्याकडे संपर्क साधून लवकरात लवकर हे सर्व खड्डे भरण्यात येतील.
- सोनाली कांबळे, रोहा आगार व्यवस्थापक