वरसे ग्रामपंचायत हद्दीत नैसर्गिक नाल्यावर भराव केल्यामुळे पावसाळ्यात सांडपाण्याची समस्या बनणार भयानक!
रोहा : समीर बामुगडे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर गृह संकुले उभारण्याची कामे सुरू असून काही ठिकाणी नैसर्गिक नाल्यावर भराव करुन बांधकाम व्यावसायीकांनी टोलेजंग इमारती उभ्या केल्याने सांडपाणी वाहून जाण्यासाठी उपायजोजना न करता वरसे ग्रामपंचायतीने बांधकाम परवानगीत अटी-शर्थीं व नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये अनेकदा हा विषय चर्चिला जात आहे.
वरसे ग्रामपंचायतीकडून पावसाळ्यापूर्वी अशा बाबीत सर्वेक्षण करणे गरजेचे असल्याचे मत सूज्ञ नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. यामुळे पूर सदृष्य परिस्थितीचा अंदाज येणास मदत झाली असती. पंरतु वरसे ग्रामपंचातीचा कारभार वेगळाच असल्याचे दिसत आहे. वरसे ग्रामपंचायतीने मान्सून पूर्व कालवा साफसफाई व नाले, गटारे सफाईची कामे हाती घेत ६० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा केला असला तरी पावसाळ्यात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होते. डोंगरातुन येणारे नाले व नदी लगत असलेल्या वसाहतीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर वरसे ग्रामंपयात हद्दीत बेकायदेशीर बांधकाम मोठ्या प्रमाणात असुन याठिकाणी नागरिकांना पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागते.