खोपे येथे ग्रामपंचायतीने शेतीमध्ये विहीर खोदून पाईपलाईन टाकून केले अतिक्रमण?
धोंडखार तर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीच्या विरोधात उच्चस्तरिय तक्रारी दाखल
रोहा : समीर बामुगडे
रोहा तालुक्यातील धोंडखार तर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीने कोणतीही परवानगी न घेता येथील राजाराम सहादेव जोशी यांच्या शेतजमीनीमध्ये बेकायदेशीररित्या विहीर खोदून, पाईपलाईल टाकून व विद्युत पोल बसवून अतिक्रमण केल्यामुळे प्रचंड नुकसान झाल्याची तक्रार खोपे, कोकबन येथील राजाराम सहादेव जोशी यांनी केली आहे.
रोहा तालुक्यातील खोपे येथील राजाराम सहादेव जोशी यांची संयुक्त मालकीची गट नं. ३०९ ही जमीन मिळकत असून खेळणी विकण्याच्या व्यवसायानिमित्त ते सतत बाहेर फिरत असून १५-१५ दिवस किंवा महिनोमहिने ते गावी येत नाहीत. याचाच गैरफायदा घेऊन धोंडखार तर्फे बिरवाडी या ग्रामपंचायतीने राजाराम जोशी यांच्या कुटूंबियांची कोणतीही परवानगी न घेता, अथवा पूर्वसूचना न देता शेताच्या मध्यभागावरून महावितरण कंपनीकडून विजेचे खांब बसवून त्यावरून विजवाहक तारा बसवून घेतल्या. तसेच शेतामध्ये विहीर खोदून, पाईपलाईन टाकून अतिक्रमण केलेले आहे.
सदरचे अतीक्रमण हटवून जागा मोकळी करून देण्याबाबत राजाराम सहादेव जोशी यांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या, परंतु ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष करून आपला मनमानी कारभार चालू ठेवल्याचा राजाराम सहादेव जोशी यांच्या कुटूंबियांचा आरोप आहे. याप्रकरणी उच्चस्तरिय तक्रारी दाखल करण्यात आलेल्या असून तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.