मोरीच्या कामामुळे एसटीची प्रवाशांकडे पाठ ; मनमानी करणाऱ्या वाहक चालकांवर कारवाई करण्याची मागणी

नागोठणे : महेंद्र माने

नागोठणे येथील एसटी बस स्थानकाच्या परिसरातील रस्त्यावर सुरू असलेल्या मोरीच्या कामामुळे एसटीच्या थांबा असलेल्या गाड्या परस्पर महामार्गावरून नेण्यात येत असल्याने प्रवाशांचे हाल होत असून, मनमानी करणाऱ्या वाहक चालकांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नूतनिकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या या धोकादायक मोरीच्या कामाला अवती भवतीनंतर १५ दिवसांपूर्वी मुहुर्त लागला आहे. नागोठणे - महाड मार्गावर ही मोरी असल्याने सुरू झाल्यापासून रस्ता बंद करण्यात आला आहे. नागोठणे - महाड मार्गावरील मोरीचे काम सुरू असल्याने तेथून होणारी दुतर्फा वाहतूक तूर्त बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे महाड , श्रीवर्धन बाजूकडे जाणाऱ्या येणाऱ्या एसटीच्या गाड्यांना महामार्गावरून आतमध्ये जावे यावे लागत आहे. मोरीचे सुरू असलेले काम मुळात काही तरी कारणे सांगून आणि थांबा असूनही गाडी स्थानकात आणण्यास टाळाटाळ करणाऱ्या वाहक चालकांच्या पथ्यावर पडले असून, ते बाहेरच्या बाहेर निघून जात आहेत. थांबा असताना गाडी स्थानकात का नेली जात नाही, असे एखाद्या प्रवाशाने विचारले तर त्याला उर्मट उत्तर देऊन गप्प बसविले जाते किंवा तक्रार करण्याचा सल्ला दिला जातो. थांबा असूनही गाडी स्थानकात येत नसल्याने प्रवाशांना नाहक ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे काही प्रवासी नाईलाजास्तव महामार्गावर जातात किंवा खासगी वाहनाचा आधार घेत प्रवास करतात. मुळात या बस स्थानकात थांबा असतानाही न येणाऱ्या गाड्यांची संख्या मोठी असून, एसटीचे वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शिवाय जनतेचे प्रतिनिधी म्हणविणाऱ्यांना सामान्य प्रवाशांकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने प्रवासी निमूटपणे प्रवास करीत आहेत. 

अलीकडे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीचे कारण देऊन काही गाड्या परस्पर महामार्गावरून नेल्या जात आहेत. वाहतूक कोंडीची समस्या महाडपासून पनवेलपर्यंत सर्वच ठिकाणी असताना याच ठिकाणची वाहतूक कोंडी चालक - वाहकांना त्रासदायक का ठरते, हा संशोधनाचा विषय होऊन बसला आहे. 

मोरीचे काम पूर्ण होण्यास अजून किमान 8 ते 10 दिवस लागतील असा अंदाज असून, तोपर्यंत एसटीच्या वाहक चालकांची मनमानी सहन करावी लागणार असल्याने प्रवाशांच्या पोटात गोळा आला आहे. विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी या बस स्थानकात गाडी आणण्यास टाळाटाळ का केली जाते याचा शोध घेऊन मनमानी करणाऱ्या वाहक - चालकांना वठणीवर आणण्याची मागणी होत आहे. एकीकडे एसटी तोट्यात असल्याचे रडगाणे गायचे आणि दुसरीकडे प्रवाशांना रडकुंडीला आणायचे, असा सध्या विरोधाभास पहावयास मिळत आहे.

दरम्यान,येथील स्थानकात थांबा असलेल्या गाड्या येत नसल्याबाबत रोहा आगार व्यवस्थापक सोनाली कांबळे यांना विचारले असता त्यांनी ज्या एस.टी. बसेस आत येत नाहीत त्या प्रत्येक डेपोमध्ये पत्र पाठवून गाड्या आत आणण्याबाबत सूचना करणार असल्याचे सांगितले.

Popular posts from this blog