सुवर्णा चव्हाण यांनी साजरा केला मतिमंद विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस; समाजापुढे ठेवला वेगळा आदर्श
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे येथील रिलायन्स फौंडेशनच्या शिक्षिका तसेच रा.जि.प.च्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सुवर्णा चव्हाण यांनी शुक्रवार 24 जून रोजी आपला वाढदिवस रोहा शहरातील ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था संचलित प्रेरणा मतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा करून समाजासमोर एक नवा व वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या कार्यक्रमाला शाळेच्या संस्थापिका दर्शना आठवले, मुख्याध्यापिका रजनी चव्हाण, विशेष शिक्षिका श्रिया जोशी, अर्चना भोईर, मूकबधिर असलेले शिक्षक अभिजित लाड यांच्यासह सेवक पदावरील टेमकर, मालुसरे व विद्यार्थी उपस्थित होते.
शिक्षिका सुवर्णा चव्हाण यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रोहा येथील मतिमंद मुलांच्या शाळे जाऊन विद्यार्थ्यांच्या समवेत केक कापून, मुलांना भेट वस्तु व त्यांच्या बरोबर कॅरम खेळत वाढदिवसाचा खराखुरा आनंद घेतला.व शाळेला रुपये पाच हजारांची देणगी दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पुष्पगुच्छ व शुभेच्छा पत्रांनी सुवर्णा चव्हाण यांचे स्वागत केले. आपल्या भावना व्यक्त करताना येथील मुलांना उत्तम शिक्षण,आरोग्याची विशेष काळजी घेऊन शाळा सुसज्ज व अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवल्याबद्दल संस्थेच्या संस्थापिका दर्शना आठवले यांचे कौतुक करून त्यांचा व तेथील शिक्षकांचाही भेट वस्तु देऊन सत्कार केल्याचे सांगून हा कार्यक्रम करताना मुलांच्या चेहर्यावरील आनंद व त्यांचा उत्साह बघून समाधान वाटल्याचे शेवटी सुवर्णा चव्हाण यांनी सांगितले.